गुगलने आयोजित केलेल्या मेगा लाँचिंग इव्हेंटमध्ये गुगल पिक्सल २ आणि पिक्सल २ एक्सएल हे अनेक सरस फिचर्सने सज्ज असणारे स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. अॅपल कंपनीने गेल्या महिन्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात तीन नवीन आयफोन लाँच केले होते. यानंतर गुगल कंपनीने ४ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यात कंपनीने गेल्या वर्षी सादर केलेल्या पिक्सल फोनच्या दोन अद्ययावत आवृत्ती सादर करण्यात येतील असे आधीच अनेक लीक्समधून समोर आले होते. या अनुषंगाने या कार्यक्रमात पिक्सल २ आणि पिक्सल २ एक्सएल हे दोन मॉडेल्स जाहीर करण्यात आले.
या दोन्ही स्मार्टफोनला अॅल्युमिनियम युनिबॉडी प्रदान करण्यात आली आहे. यातील पिक्सल २ या मॉडेलमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि फुल एचडी अर्थात १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा सिनेमॅटीक डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. तर पिक्सल २ एक्सएल या मॉडेलमधील डिस्प्ले सहा इंच आकारमानाचा आणि क्युएचडी अर्थात २८८० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेचा असेल. दोन्ही मॉडेल्समध्ये थ्री-डी कॉर्निंग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. अलीकडच्या बहुतांश फ्लॅगशीप मॉडेल्सप्रमाणे या दोन्ही स्मार्टफोनमध्ये अल्वेज ऑन या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे. अर्थात स्मार्टफोनचा वापर होत नसतांनाही याच्या डिस्प्लेवर वेळ, नोटिफिकेशन्स आणि अन्य माहिती दिसते. यात अॅक्टीव्ह एज हे फिचर दिले आहे. यामुळे याच्या बाजूला स्क्विज केल्यानंतर गुगल असिस्टंट लाँच करता येतो.
गुगल पिक्सल २ आणि पिक्सल २ एक्सएल या दोन्ही मॉडेल्समध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम ४ जीबी असून इनबिल्ट स्टोअरेजसाठी ६४ आणि १२८ जीबी असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. यातल्या पिक्सल २ या मॉडेलमध्ये २७०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून पिक्सल २ एक्सएल या स्मार्टफोनमधील बॅटरी ३५२० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये अतिशय उत्तम दर्जाचा १२.२ मेगापिक्सल्स क्षमतेचा एफ/१.८ अपार्चर तसेच ऑप्टीकल व इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशनने युक्त असणारा ड्युअल पिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. डीएक्सओमार्कच्या निकषानुसार या दोन्ही मॉडेल्समधील कॅमेर्याला ९८ टक्के इतके गुण असून तो जगातील सर्वोत्तम स्मार्टफोन कॅमेरा असल्याचा दावा गुगलने केला आहे.
सर्वात लक्षणीय बाब म्हणजे या दोन्ही मॉडेलच्या कॅमेर्यांमध्ये गुगल लेन्स इनबिल्ट स्वरूपात असेल. याच्या मदतीने छायाचित्रांमधील विविध चिन्ह आणि माहितीचे कृत्रीम बुध्दीमत्तेच्या सहाय्याने आकलन करण्यात येईल. उदाहरणार्थ एखाद्या क्लासेसच्या जाहिरातीसमोर आपण कॅमेरा धरला तर यातील गुगल लेन्सच्या मदतीने संबंधीत जाहिरातदाराची वेबसाईट, ई-मेल तसेच त्याचा संपर्क क्रमांक आदी बाबींना कॅमेरा अचूकपणे पकडेल. यानंतर त्या युजरने वेबसाईटवर जावे, ई-मेल करावा की कॉल करावा? असे सर्व पर्याय त्याला उपलब्ध केले जातील. अर्थात याच्या मदतीने गुगलने कॅमेर्यात एक स्मार्ट फिचर दिले आहे. याशिवाय गुगलने मोशन फोटोज हे नवीन फिचरदेखील दिले आहे. यात छायाचित्रासोबत तीन सेकंदाचा व्हिडीओदेखील रेकॉर्ड करण्यात येणार आहे. एका अर्थाने हे अॅपलच्या लाईव्ह फोटोज या फिचरला दिलेले उत्तर होय. याशिवाय या मॉडेल्सच्या कॅमेर्यात एआर स्टीकर्स हे अतिशय चित्तथरारक फिचर देण्यात आले आहे. याच्या अंतर्गत कुणीही युजर कॅमेर्यातून काढलेल्या छायाचित्रात ऑग्युमेंटेड रिअॅलिटी या प्रकारातील अत्यंत आकर्षक असे थ्री-डी स्टीकर्स/कॅरेक्टर्स/इमोजी टाकू शकणार आहेत.
गुगल पिक्सल २ आणि पिक्सल २ एक्सएल या मॉडेल्समध्ये अँड्रॉइड ओरिओ ही अद्ययावत प्रणाली देण्यात आली आहे. अर्थात या आवृत्तीवर चालणारे हे सर्वात पहिले स्मार्टफोन असतील. तर या स्मार्टफोन्सला भविष्यातील अँड्रॉइडचे अपडेटदेखील सर्वात पहिल्यांदा मिळणार आहेत. या माध्यमातून अँड्रॉइडची शुध्द आणि अद्ययावत अनुभुती युजर्सला घेता येणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स वॉटरप्रूफ आहेत. यात हेडफोन जॅक देण्यात आलेले नाही. याऐवजी युएसबी टाईप-सी केबलच्या माध्यमातून याला हेडफोन संलग्न करता येतील. या दोन्ही मॉडेलमध्ये अतिशय दर्जेदार अशी ध्वनी प्रणाली देण्यात आली आहे.
गुगल पिक्सल २ हे मॉडेल व्हाईट, ब्लॅक आणि किंडा ब्ल्यू या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. याच्या ६४ जीबी स्टोअरेजच्या व्हेरियंटचे मूल्य ६४९ तर १२८ जीबी व्हेरियंटचे मूल्य ७४९ डॉलर्स इतके असेल. तर गुगल पिक्सल २ एक्सएल हे मॉडेल ब्लॅक आणि व्हाईट या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या मॉडेलच्या ६४ जीबी व्हेरियंटचे मूल्य ८४९ तर १२८ जीबी व्हेरियंटचे मूल्य ९४९ डॉलर्स असेल. ग्राहकांना प्रत्यक्षात १७ ऑक्टोबरपासून हे स्मार्टफोन्स मिळतील. यासोबत गुगलने प्रोमो कोडच्या माध्यमातून निवडक युजर्सला गुगल होम मिनी आपला याच कार्यक्रमात लाँच केलेला स्मार्ट स्पीकर देण्याची घोषणादेखील केली आहे.