Google I/O 2022 इव्हेंट काल अर्थात 11 मेपासून सुरु झाला आहे. या इव्हेंटमधून अपेक्षेप्रमाणे Google Pixel 6A स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. हा Pixel 6 सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्यामुळे पिक्सलप्रेमी याची आतुरतेने वाट बघत होते. गुगलनं देखील या स्वस्त स्मार्टफोनमध्ये आपली फ्लॅगशिप चिप देऊन ग्राहकांना खुश केलं आहे.
Google Pixel 6A चे स्पेसिफिकेशन्स
गुगलच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.1 इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 2,340 x 1,080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या स्क्रीनला Corning Gorilla Glass 3 ची सुरक्षा देण्यात आली आहे. सिक्योरिटीसाठी यात अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये लाईव्ह ट्रान्सलेशन सारखे अनेक भन्नाट फीचर मिळतात.
यात Titan M2 सिक्योरिटी प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये Google Tensor चिप मिळते जिचा वापर या सीरिजमधील फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये देखील करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. कंपनी 5 वर्ष सिक्योरिटी अपडेट आणि 3 वर्ष अँड्रॉइड अपडेट देणार आहे. फोनमध्ये 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे.
कॅमेरा सेटअप पाहता या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 12.2MP चा मेन कॅमेरा आणि 12MP चा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हँडसेट मध्ये 4306mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की Extreme Battery Saver मोड ऑन करून सिंगल चार्जमध्ये 72 तास ही बॅटरी वापरता येईल.
किंमत
याची किंमत 499 डॉलर म्हणजे (जवळपास 38,614 रुपये) आहे. 21 जुलैपासून हा फोन प्री-ऑर्डर करता येईल तर 28 जुलैपासून याची विक्री सुरु होईल. हा फोन 3 कलर ऑप्शनमध्ये लाँच केला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार यंदा Google Pixel 6A भारतीय बाजारात देखील सादर केला जाऊ शकतो. याची भारतीय किंमत 35,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.