पूर्वीच्या काळी एवढे रस्तेही नव्हते की वाहने. आता रस्ते एवढे झालेत की एक टर्न जरी चुकला तरी पुन्हा योग्य मार्गावर येण्यासाठी भोवाडा मारावा लागतो. वाहन चालकांच्या या समस्या हलक्या केल्या त्या गुगलने.गुगल गेल्या अनेक वर्षांपासून तुम्हाला जायचेय त्या ठिकाणाचा रस्ता सांगतो. गुगल मॅप यासाठी खूप उपयोगी येते.
गुगल मॅपवर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातूनही चांगल्या व्ह्यूसाठी गुगलने Street View App आणले होते. मात्र आता हे अॅप बंद करण्याची घोषणा कंपनीने केली आहे. हे अॅप येत्या २१ मार्च २०२३ पर्यंतच सुरु राहणार आहे. 9To5Google नुसार गुगलने या अॅपचे अनेक शटडाऊन मेसेज तयार केले आहेत. यानुसार गुगल हे अॅप वापरणाऱ्यांना गुगल मॅप्स किंवा स्ट्रीट व्ह्यू स्टुडिओला जाण्याचा सल्ला देत आहे.
हे अॅप सध्या iOS आणि अँड्रॉईडवर उपलब्ध आहे. हे अॅप युजर्सना स्ट्रीट व्ह्यूसोबतच गुगल मॅपवर ठिकाणे सर्च करण्याची परवानगी देते. तुमचा स्वतःचा 360 व्हिडिओ प्रकाशित करण्यासाठी स्ट्रीट व्ह्यू स्टुडिओमध्ये स्विच करा, Photo Sphere साठी गुगल मॅप वापरा, असे गुगल सांगत आहे. 360-डिग्री इमेजरीमध्ये योगदान देता येणार आहे. याला टेक्निकल भाषेत ‘फोटो स्फिअर’ म्हटले जात आहे.