दिग्गज टेक्नॉलॉजी कंपनी गुगल आपला Pixel 5a हा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीकडून लाँच केला जाणारा हा स्मार्टफोन परवडणाऱ्या दरातील असणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, काही ठिकाणी या स्मार्टफोनचं लाँच टाळण्यात आल्याचं म्हटलं होतं. परंतु हा स्मार्टफोन याच महिन्यात किंवा आगामी महिन्यात लाँच केला जाण्याची शक्यता एका रिपोर्टमधून वर्तवण्यात आली आहे. लाँच डेट व्यतिरिक्त या स्मार्टफोनची किंमतही लिक झाली आहे.
इंग्रजी वेबसाईट FrontPageTech च्या रिपोर्टनुसार गुगल नवा Pixel 5a हा स्मार्टफोन येत्या २६ ऑगस्ट रोजी लाँच करणार आहे. या वेबसाईटनं सूत्रांच्या हवाल्यानं या तारखेचा खुलासा केला आहे. तसंच या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 765G प्रोसेसर, 6GB रॅम आणि 4650mAh ची बॅटरी देण्यात येणार आहे.
अन्य फीचर्सबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये 6.34 इंचाचा स्क्रीन देण्यात आला आहे. तसंच हा 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. यामध्ये 2020 मध्ये आलेल्या Pixel 5 प्रमाणेच कॅमेरा आणि एक हेडफोन जॅक मिळण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये IP67 रेटिंगही मिळू शकतं. परंतु यामध्ये वायरलेस चार्जिंग नसेल असं म्हटलं जात आहे.
किती असेल किंमत?जे लोक Pixel 5a च्या भारतात लाँच होण्याची वाट पाहत होते, त्यांच्या पदरी मात्र निराशा येण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन सध्या केवळ अमेरिका आणि जपानमध्ये लाँच केला जाणार असल्याचं गुगलनं स्पष्ट केलं होतं. या स्मार्टफोनची किंमत 450 डॉलर्स म्हणजेच जवळपास 33,900 रूपये असण्याची शक्यता आहे. तसंच हा स्मार्टफोन ऑनलाईन किंवा फिजिकल रिटेल स्टोरद्वारे विक्रीसाठी उपलब्ध केला जाऊ शकतो.