गुगलने भारतीयांसाठी मोफत वाय-फायच्या विस्ताराची योजना आखली असून याच्या अंतर्गत आता रेल्वे स्थानकांच्या पलीकडेही या प्रकारची सेवा प्रदान करण्यात येणार आहे. गुगलने रेलटेलच्या सहकार्याने भारतातील ४०० रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना इंटरनेट उपलब्ध केले आहे.प्रारंभी या योजनेच्या यशस्वीतेबाबत संभ्रमाचे वातावरण होते. मात्र ही योजना अतिशय उत्तमरीत्या कार्यान्वित करण्यात आली असून कोट्यवधी प्रवासी याचा उपयोग करत आहेत. यामुळे उत्साहीत होऊन गुगलने आपल्या या मोफत वाय-फाय सेवेचा विस्तार करण्याचे आता जाहीर केले आहे. याचे कार्यान्वित नेमके कसे होणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. तथापि रेल्वे स्थानकांप्रमाणेच भारतातील अन्य सार्वजनिक स्थळांवर हा प्रयोग करण्यात येणार आहे. यासाठी गुगलने इंटरनेटच्या सेवा पुरवठादारांसह विविध कंपन्यांशी आधीच बोलणी सुरू केल्याचे वृत्त आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांमध्ये तब्बल ४ कोटी नवीन युजर्स इंटरनेटशी कनेक्ट करण्याचा संकल्प गुगलने व्यक्त केला आहे. अॅनालिसीस मेसन या संस्थेच्या ताज्या अहवालात गुगलने याबाबत सूतोवाच केले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे भारतीय रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय उपलब्ध करण्याचा प्रकल्प आता मेक्सीको आणि इंडोनेशियातील रेल्वे स्थानकांवरही राबविण्यात येणार असल्याची माहिती गुगलने दिली आहे.
गुगलची मोफत वाय-फायच्या विस्ताराची योजना
By शेखर पाटील | Published: July 05, 2018 1:18 PM