नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या एक कोटीच्या वर गेली आहे. सरकारने लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक अॅप विकसित केले आहे, जे लसीकरणावर नजर ठेवणार आहे. Co-WIN असं या अॅपचं नाव आहे . हे Co-WIN App मोफत डाऊनलोड करता येणार आहे. मात्र आता केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील नागरिकांना Co-WIN अॅपच्या नावाखाली कोणतंही बनावट Mobile App डाऊनलोड करणं आणि त्यावर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करण्याबाबत सावध केलं आहे. याबाबत लोकांना अलर्ट केलं आहे. सरकारने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.
"गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर Co-WIN अॅपच्या नावाशी मिळते जुळते अनेक अॅप उपलब्ध झाले आहेत. जे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारू शकतात. काही अॅप्स असे देखील आहेत, जे 10 हजारपेक्षा अधिक जणांनी डाऊनलोड देखील केले आहे. यामुळे ग्राहकांचे मोठे नुकसान होऊ शकते" अशी माहिती ट्विटमधून देण्यात आली आहे. तसेच "सरकारचे अधिकृत प्लॅटफॉर्म असणाऱ्या अॅपच्या नावाप्रमाणेच असणारे #CoWIN नावाचे अॅप तयार करण्यात आले आहेत. हे अॅप्स डाऊनलोड करू नका किंवा त्यावर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका" अशा आशयाचे ट्वीट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ट्विटरवरून करण्यात आले आहे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 13 जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरणास सुरुवात होऊ शकते. दरम्यान या लसीकरणाबाबत सर्व माहिती CoWIN अॅपवर उपलब्ध करण्यात येईल, लवकरच हे अॅप लाँच केलं जाईल. या अॅपच्या माध्यमातून कोरोना लसीसाठी फ्री रजिस्ट्रेशन करू शकता. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर पूर्णपणे फ्री असेल आणि युजर्स अत्यंत सोप्या पद्धतीने हे अॅप डाऊनलोड करू शकतात. सध्या गुगल प्ले स्टोअर किंवा अन्य कोणत्या प्ले स्टोअरवर हे अॅप उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही.
को-विन अॅपमध्ये लसीकरण प्रक्रियेपासून प्रशासनाचे काम, लसीकरण कर्मचाऱ्यांची तसेच ज्यांना लस द्यायची आहे त्यांची माहिती दिली जाणार आहे. यामध्ये सेल्फ रजिस्ट्रेशनचाही पर्याय असणार आहे. ग्रामपंचायत सरपंच देखील त्याच्या गावातील लोकांच्या लसीकरणासाठी या अॅपद्वारे अर्ज करू शकणार आहे. भारतात लसीकरण तीन टप्प्यांमध्ये केले जाईल. आरोग्य कर्मचारी, आपत्कालीन सेवा कर्मचारी असे दोन टप्पे आहेत. याची माहिती गोळा करण्याचे काम राज्य सरकारांना देण्य़ात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात कोरोना लस ही गंभीर आजारांशी लढणाऱ्या लोकांना दिले जाणार आहे. या सर्वांचे Co-WIN अॅपवर रजिस्ट्रेशन होणार आहे.
कसे काम करेल?
को-विन अॅप पाच टप्प्यांमध्ये विभागले गेले आहे. यामध्ये प्रशासनिक मॉड्यूल, रजिस्ट्रेशन मॉड्यूल, लसीकरण, लाभ स्वीकृती मॉड्यूल, रिपोर्ट अशी पाच मॉड्यूल आहेत. रिपोर्टद्वारे लाभार्थीला आणि देणाऱ्यांना नोटिफिकेशन पाठविले जाणार आहे. आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत याची माहिती दिली आहे.