नवी दिल्ली - टेक्नॉलॉजीच्या जगात हॅकींगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हॅकींगचे नवनवे प्रकार समोर येत आहेत. केवळ टायपिंगचा आवाज ऐकून हॅकर्स पासवर्ड हॅक करू शकतात अशी नवी माहिती आता समोर आली आहे. साऊंडवेव्सच्या मदतीने या गोष्टी केल्या जातात. स्मार्टफोनच्या कीबोर्डवर युजर्स टाईप करतात तेव्हा त्यातून काही साऊंडवेव बाहेर येतात. टायपिंगच्या वेळी स्क्रीनवर येणाऱ्या प्रत्येक स्ट्रोकचं वेगळं व्हायब्रेशन असतं. मात्र हे व्हायब्रेशन कानाला ऐकू येत नाही.
हॅकर्स साऊंडवेवच्या मदतीने पासवर्ड हॅक करतात. टायपिंगचं व्हायब्रेशन ते अॅप्सच्या मदतीने ऐकू शकतात. काही खास अॅप्स आणि अल्गोरिदमने स्मार्टफोनवरून तयार होणाऱ्या साऊंडवेव ऐकता आणि डीकोड करता येतात. रिसर्चर्सनी 45 लोकांना मॅलवेअर असलेला स्मार्टफोन वापरण्यासाठी दिला होता. मॅलवेअर एका अॅपमध्ये होतं. त्यानंतर या सर्व लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी उभं करून फोनमध्ये टेक्स्ट एंटर करायला सांगितला. टायपिंग दरम्यान मॅलवेअर अॅपने प्रत्येक कीस्ट्रोकवरून निर्माण झालेल्या वेव अगदी सहजपणे रेकॉर्ड केल्या.
साऊंडवेव्स रेकॉर्ड झाल्यानंतर रीसर्चर्सच्या टीमने मशीन लर्निंग अल्गोरिदममधून हे डीक्रिप्ट केलं. कीबोर्डच्या कोणत्या लोकेशनवरून कोणती साऊंडवेव आली आहे हे सिस्टम वेवच्या माध्यमातून जाणून घेता येतं. तसेच अक्षर आणि शब्दांच्या मदतीने सहजपणे हे डीकोड केलं जातं. हॅकर्स याच पद्धतीने पिन कोड, पासवर्ड हॅक करतात. युजर्स फोनमध्ये अनेक अॅप इन्स्टॉल करत असतात. त्यावेळी अॅप काही परमिशन्स मागतं. तेव्हा क्लिक करताना चूक केल्यास अशा गोष्टींचा सामना करावा लागतो.
तब्बल सव्वा दोन कोटी लोक ठेवतात 'हा' पासवर्ड; तुमचाही आहे का?यूकेच्या नॅशनल सायबर सिक्यॉरिटी सेंटर (NCSC) ने दिलेल्या एका डेटानुसार, '123456' हा जगभरात सर्वात जास्त वापरला जाणारा कॉमन पासवर्ड असून तो अत्यंत सहजपणे हॅक केला जाऊ शकतो. तर '123456789' हा पासवर्ड दुसऱ्या क्रमांकावर आहे. यासोबतच 'qwerty', '1111111' आणि 'password' हे पासवर्ड देखील असुरक्षित पासवर्डच्या यादीत सर्वात वरच्या स्थानी आहे. 123456 हा पासवर्ड वापरणाऱ्यांची संख्या ही तब्बल 2 कोटी 30 लाखांहूनही अधिक असल्याची माहिती संशोधनातून समोर आली आहे.
Ashley, Michael, Daniel, Jessica आणि Charlie हे पासवर्डही आता कॉमन झाले असून हे सहज हॅक करता येतात. काही युजर्स फुटबॉल टीम, बॅटमॅन आणि सुपरमॅन सारखे सुपरहीरो आणि पोकेमॉनसारखे कार्टून कॅरेक्टर आपला पासवर्ड म्हणून सेट करत असल्याची माहिती संशोधनातून समोर आली आहे. जर तुम्ही देखील अशाच प्रकारचे पासवर्ड सेट करत असाल तर सतर्क व्हा आणि पासवर्ड लगेचच बदला जेणेकरून तुमचं आकाऊंट हे सुरक्षित राहील. एनसीएससीचे टेक्निकल डायरेक्टर डॉ. इयान लेवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे लोक सोप्या पासवर्डचा वापर करतात ते स्वत: हून हॅकींगचे शिकार होत आहेत. त्यामुळे हॅकींगपासून बचाव करायचा असल्यास सुरक्षित पासवर्ड सेट करा.