मुंबई : नववर्षाच्या शुभेच्छा देताना रात्री बरोबर १२ वाजता व्हॉट्सअॅप तब्बल २ तास बंद पडलं होतं. त्यानंतर अनेकांनी व्हॉट्सअॅप बंद पडल्याच्या तक्रारी ट्विटरद्वारे द्यायला सुरुवात केली होती. २ तासांनी व्हॉट्सअॅप सुरू झालं तेव्हा कित्येकजण झोपी गेले होते. पण आता अशी माहिती समोर येतेय की, नवीन वर्षात शुभेच्छा देण्यासाठी तब्बल २० अब्ज संदेश भारतीयांकडून पाठविण्यात आले आहेत. व्हॉट्सअॅपनेच याविषयी अधिकृत माहिती दिलीय. आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी आकडेवारी असल्याचंही सांगण्यात येत आहे. व्हॉट्सअॅप खरंतर आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं अॅप आहे. आजवर मॅसेजिंगचे असंख्य अॅप आले. मात्र तरीही व्हॉट्सअॅपची जागा कोणत्याच अॅपने घेतली नाही. रोज असंख्य मॅसेज या व्हॉट्सअॅपद्वारे केले जातात. आजवर जगभरात जवळपास २ बिलिअन युजर्स व्हॉट्सअॅपला लाभले आहेत. म्हणूनच नववर्षाच्या स्वागताचे संदेश देण्यासाठी युजर्सने व्हॉट्सअॅपचा अधिक वापर केला.
व्हॉट्सअॅपने या रिलीजमध्ये सांगितलंय की, ‘नविन वर्षाचा दिवस व्हॉट्सअॅपवर अधिक संदेश पाठवणारा दिवस ठरला. गेल्यावर्षी ही आकडेवारी १४ अब्ज एवढी होती. ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजल्यापासून ते दुसऱ्यादिवशी म्हणजेच १ जानेवारी ११.५९ पर्यंतची ही आकडेवारी आहे. तर संपूर्ण जगभरात तब्बल ७५ अब्ज संदेश पाठवण्यात आले आहेत. त्यामध्ये १३ अब्ज फोटो अआणि ५ अब्ज व्हिडिओ आहेत. दोन तास व्हॉट्सअॅप बंद राहूनही एवढी मोठी आकडेवारी समोर आली आहे, जर त्यादिवशी व्हॉट्स अॅप डाऊन झालं नसतं तर हीच आकडेवारी कदाचित मोठी असली असती.’
गेल्या वर्षभरात व्हॉट्सअॅपने अनेक फिचर्स लॉन्च केले. त्यामुळे युजर्स जास्तीत जास्त प्रभावित होत गेले. आज प्रत्येक स्मार्टफोन वापरणाऱ्या व्यक्तीकडे व्हॉट्सअॅप आहे. व्हिडिओ कॉलिंगपासून ते एकमेकांचे स्टोरी अपडेट पाहण्यापर्यंत सारंकाही व्हॉट्सअॅपने उपलब्ध करून दिल्याने इतर अनेक अॅप मागे पडले. दिवसेंदिवस अपडेट होत राहणाऱ्या व्हॉट्सअॅपने त्यांच्या युजर्सची संख्याही वाढवत नेली. त्यामुळेच नविन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वाधिक संदेश व्हॉट्सअॅपद्वारे पाठवण्यात आले. केवळ २२ तासात फक्त भारतातून २० अब्ज संदेश पाठवण्यात आले आणि जगभरातून ७५ अब्ज संदेश पाठवण्यात आले. साहजिकच सर्वाधिक संदेश पाठवण्यासाठी नविन वर्ष हा दिवस फार महत्त्वाचा ठरला आहे.