गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड उत्सुकता लागून असलेल्या आयफोन८ आणि आयफोन ८ प्लस या दोन नवीन मॉडेल्सचे अखेर आगमन झाले असून अॅपल कंपनीतर्फे आज आयोजित कार्यक्रमात याचे अनावरण करण्यात आले.
आयफोनचे लाँचींग हा नेहमीच टेकविश्वातील प्रचंड औत्सुक्याचा विषय असतो. यानुसार नवीन आयफोन नेमका कोणता असेल? यात काही फिचर्स असतील? याबाबत मोठ्या प्रमाणात चर्वण झाले होते. या पार्श्वभूमिवर अॅपल कंपनीने एका शानदार कार्यक्रमात आयफोन या मॉडेलची नवीन आवृत्ती लाँच केली. अॅपल कंपनीने उभारलेल्या स्टीव्ह जॉब्ज थिएटरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात कंपनीचे सीईओ टिम कुक यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकार्यांनी विविध उपकरणांची घोषणा केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी अॅपलच्या नवीन स्पेसशीप आकाराच्या भव्य कॉम्प्लेक्सची माहिती देणारा व्हिडीओ दाखविण्यात आला. यानंतर स्टीव्ह जॉब्ज यांनी हातात आयफोन घेतल्याची भव्य प्रतिमा दर्शवून त्यांचा संदेश ऐकविण्यात आला. टिम कुक यांनीही जॉब्ज यांचेच स्मरण करत कार्यक्रमास प्रारंभ केला. त्यांनी प्रारंभी नव्यानेच उभारण्यात आलेल्या अॅपल पार्कची सांगोपांग माहिती दिली. यानंतर ते मुख्य कार्यक्रमाकडे वळले.
प्रारंभी अॅपलच्या रिटेल विभागाच्या प्रमुख अँजेला अहरेंडस् यांचे व्यासपीठावर आगमन झाले. त्यांनी सुरवातीला अॅपलने अलीकडेच सुरू केलेल्या टुडे अॅट अॅपल या इन-स्टोअर एक्सपेरियन्स कार्यक्रमाबाबत माहिती दिली. यासोबत त्यांनी अॅपलच्या रिटेला स्टोअर्समधील विस्ताराबाबत विवेचन केले. यानंतर अॅपल स्मार्टवॉच आणि अॅपल टिव्ही लाँच झाल्यानंतर आयफोनची घोषणा करण्यात आली. यात पहिल्यांदा आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस हे दोन मॉडेल लाँच करण्यात आले.
आयफोन ८ आणि ८ प्लस या दोन्ही मॉडेल्समधील बरीच फिचर्स समान आहेत. यात पुढील आणि मागील बाजूस ग्लासचे आवरण देण्यात आले आहे. हे मॉडेल सिल्व्हर, स्पेस ग्रे आणि गोल्ड फिनीश या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. दोन्हींमध्ये रेटीना डिस्प्लेयुक्त अनुक्रमे ४.७ आणि ५.५ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा सुपर अमोलेड ट्रु-टोन डिस्प्ले देण्यात आला आहे. या दोन्ही आयफोनमध्ये थ्री-डी टच तंत्रज्ञान देण्यात आले आहे. तर डिस्प्लेमध्ये ट्रु-टोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यामुळे विविध वातावरणात राहूनही डिस्प्लेचे तापमान कायम राहते. या दोन्ही आयफोनमध्ये सिक्स-कोअर ए११ बायोनिक हा प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर आधीच्या ए१० पेक्षा अधिक गतीमान आणि कार्यक्षम असा आहे.
आयफोन ८ या मॉडेलमध्ये १२ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. यात ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशनची सुविधा असेल. तर आयफोन ८ प्लस या मॉडेलमध्ये १२ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यात डीपर पिक्सलची सुविधा असल्यामुळे ते अन्य कॅमेर्यांपेक्षा ८३ टक्के अधिक प्रकाशयुक्त प्रतिमा काढू शकत असल्याचा अॅपलचा दावा आहे. यातील एक कॅमेरा एफ/१.८ अपार्चरयुक्त असेल. तर दुसरा टेलिफोटो लेन्सयुक्त कॅमेरा एफ/२.८ अपार्चरयुक्त असेल.
आयफोन८ आणि ८ प्लस या मॉडेल्समध्ये कंपनीने विकसित केलेल्या व्हिडीओ एनकोडर देण्यात आला आहे. यात २४० फ्रेम्स प्रति सेकंद या गतीने १०८० पिक्सल्स क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करता येणार आहे. तर मोशन ट्रॅकींगसाठी हा कॅमेरा गायरास्कोप आणि अॅक्सलेरोमीटरचा उपयोग करणार आहे. आयफोन ८ प्लस या मॉडेलमध्ये एआरचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. अर्थात हे मॉडेल्स अॅपल एआर किटशी सुसंगत असतील. यामुळे ऑग्युमेंटेड रिअॅलिटीशी ऑप्टीमाईज्ड असणारे अॅप यात वापरता येतील. या अनुषंगाने या कार्यक्रमात काही एआर गेम्स दर्शविण्यात आले. या दोन्ही मॉडेल्समध्ये क्युआय या मानकावर आधारित वायरलेस चार्जींगची सुविधादेखील देण्यात आली आहे.
आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस हे दोन्ही मॉडेल्स ६४ आणि २५६ जीबी स्टोअरेजच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहेत. आयफोन ८च्या ६४ जीबी स्टोअरेजच्या व्हेरियंटचे मूल्य ६९९ डॉलर्स तर २५६ जीबीचे मॉडेल ७९९ डॉलर्सपासून सुरू होणारे असेल. तर आयफोन ८ प्लस या मॉडेलचे मूल्य मात्र जाहीर करण्यात आले नाही. या दोन्ही मॉडेल्सची १५ सप्टेंबरपासून नोंदणी सुरू झाली असून २२ सप्टेंबरपासून ते ग्राहकांना मिळणार आहेत.