एचएमडी ग्लोबल कंपनी लवकरच आपला नोकिया ६.१ प्लस हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
या वर्षीच्या मे महिन्याच्या पूर्वार्धात नोकिया ब्रँडची मालकी असणार्या एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया ६.१ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच केला होता. आता याचीच पुढील आवृत्ती नोकिया ६.१ प्लस या मॉडेलच्या माध्यमातून ग्राहकांना सादर करण्यात येणार आहे. नावातच नमूद असल्यानुसार यामध्ये आधीपेक्षा अधिक सरस फिचर्स असणारे हे स्पष्ट आहे. या कंपनीने चीनमध्ये नोकिया एक्स६ हे मॉडेल आधीच उपलब्ध केलेले आहे. यालाच नोकिया ६.१ प्लस या नावाने भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात येईल अशी शक्यता वाटत असून टिझरमधून याचे संकेत मिळाले आहेत.
नोकिया ६.१ प्लस या मॉडेलमध्ये ५.८ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा (२२८० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले असेल. यातील अस्पेक्ट रेशो हा १९:९ असा असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ६३६ प्रोसेसर असेल. याची रॅम ४ जीबी व ६४ जीबी स्टोअरेज असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल.
नोकिया ६.१ प्लस या मॉडेलच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. यामध्ये १६ व ५ मेगापिक्सल्सच्या दोन कॅमेर्यांचा समावेश असणार आहे. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असून यामुळे उत्तम दर्जाच्या प्रतिमा घेता येणार आहेत. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असणार आहे. या कॅमेर्यांमध्ये बोथी इफेक्टची सुविधा आहे. याच्या मदतीने एकाच वेळी दोन्ही कॅमेर्यांचा उपयोग करता येणार आहे. यामध्ये एचडीआर तंत्रज्ञानाचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. तसेच यात एआय म्हणजेच कृत्रीम बुध्दीमत्तेवर आधारित विविध फिचर्सदेखील देण्यात येणार आहेत. हे मॉडेल अँड्रॉईडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारे असून यात ३०६० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आलेली आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.