हुआवेचा ब्रँड असणार्या ऑनरने या वर्षीच्या मे महिन्यात भारतीय ग्राहकांसाठी आपले ऑनर ८ लाईट हे मॉडेल १७,९९९ रूपये किंमतीत लाँच केले होते. यात आता दोन हजार रूपयांची कपात करण्यात आली आहे. परिणामी आता हा स्मार्टफोन ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये १५,९९९ रूपयात उपलब्ध करण्यात आला आहे.
ऑनर ८ लाईट या स्मार्टफोनमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा २.५ डी वक्राकार डिस्प्ले असेल. यात हुआवेचा हायसिलीकॉन किरीन ६३५ प्रोसेसर असेल. याची रॅम ४ जीबी व स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येईल. एलईडी फ्लॅशसह यात १२ मेगापिक्सल्सचा मुख्य तर ७७ अंशाच्या लेन्ससह ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. याच्या मुख्य कॅमेर्यामध्ये ऑटो-फोकस, कंटिन्युअस शुटींग, डिजिटल झूम, जिओटॅगींग, पॅनोरामा, एचडीआर, टचफोकस, फेस डिटेक्शन, व्हाईट बॅलन्स सेटींग, सीन मोड, आयएसओ सेटींग आणि पीडीएएफ आदी फीचर्स देण्यात आले आहेत.
ऑनर ८ लाईट हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या प्रणालीवर चालणारा असून यावर कंपनीचा इएमयुआय ५.० लाईट युजर इंटरफेस देण्यात आला आहे. तर यात ३,००० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची लिथियम-पॉलिमर आयन बॅटरी असेल. जी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल २१ तासांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फीचर्स असतील. तर यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.