हुक कंपनीने भारतात अवघ्या ८९ रुपयात तीन महिन्यांची मर्यादा असणारी व्हिडीओ ऑन डिमांड सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. वास्तविक पाहता हुक कंपनीने ( https://www.hooq.tv ) २०१५ सालीच भारतात पदार्पण केले आहे. मात्र आता एकंदरीतच व्हिडीओ ऑन डिमांड या क्षेत्रातील वाढती स्पर्धा पाहता हुकने आपल्या सेवेस रिलाँच करण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी ग्राहकांना फक्त ८९ रूपयांमध्ये तीन महिन्यांपर्यंत माहिती आणि मनोरंजनाचा खजिना उपलब्ध करून दिला आहे. ही फक्त इंट्रोडक्टरी ऑफर असून यानंतर किफायतशीर दरात ही सेवा उपलब्ध होणार असल्याचे संकेत हुकतर्फे देण्यात आले आहेत.या माध्यमातून हुकने अल्प मूल्यात सेवा लाँच करतांना भारतासाठीच्या आपल्या रणनितीतदेखील बदल केल्याचे दिसून येत आहे. आता हुकने भारतीय युजर्सला हॉलिवुडचे कंटेंट पुरविण्यावर भर देण्याचे सूचित केले आहे. भारतात एकंदरीतच इंग्रजीचे ज्ञान असणारा मोठा वर्ग आहे. नेमके याला या नवीन सेवेत टार्गेट करण्यात येणार आहे. याच्या अंतर्गत हॉलिवुडमधील नवे-जुने चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, डॉक्युमेंटरीज, रिअॅलिटी शोज आदी सादर करण्यात येणार आहेत. हुककडे दहा हजारांपेक्षा जास्त हॉलिवुड आणि भारतीय चित्रपटांचा खजिना आहे. विशेष म्हणजे कोणताही हॉलिवुड चित्रपट हा रिलीज झाल्यावर ९० दिवसानंतर आपल्या ग्राहकांना सादर करण्यात येणार असल्याची ग्वाही या कंपनीने दिली आहे.आपल्या सेवेत हुकने हॉलिवुडमधील दर्जेदार कंटेंटचा समावेश केला आहे. विशेष म्हणजे ही सेवा विविध माध्यमांमधून वापरता येणार आहे. अर्थात संगणक, लॅपटॉप आणि टॅबलेटसह स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीवरही ही व्हिडीओ ऑन डिमांड सेवा वापरता येईल. हुक कंपनीने अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी स्मार्टफोन अॅप्लिकेशन तयार केले आहे. याच्या मदतीने ग्राहक या सेवेचा लाभ घेऊ शकतो. विशेष बाब म्हणजे हुकने भारतात पहिल्यांदाच टिव्हीओडी म्हणजेच ट्रॉन्झॅक्शनल व्हिडीओ ऑन डिमांड या प्रकारातील सेवादेखील आपल्या ग्राहकांना देऊ केली आहे. यात पे-पर-वॉच या पध्दतीने ग्राहकाला त्याने पाहिलेल्या कंटेंटसाठीच पैसे मोजावे लागतील.
भारतात व्हिडीओ ऑन डिमांड सेवा प्रचंड गतीने विस्तारत असल्याचे दिसून येत आहे. हॉटस्टार, जिओ, वूथ, अमेझॉन व्हिडीओ, सोनी लिव्ह, नेटफ्लिक्स आदींनी बाजारपेठेत विविध आकर्षक प्लॅन्स सादर केले आहेत. यात आता हुकने अत्यल्प दरात ग्राहकांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न केल्याचे अधोरेखित झाले आहे.