आपल्या हातात स्मार्ट फोन आल्यापासून आपण आणि आपल्या घरातील मुलं सतत निरनिराळ्या प्रकारची ॲप्स डाऊनलोड करत असतो. पण, कधी हा विचार केलाय का, कुठल्या ॲपवर किती वेळ जातो आणि तितका वेळ त्या ॲपला देणं आवश्यक आहे का? स्मार्ट फोन आणि डिजिटल इंडस्ट्रीही आता सकारात्मक विचार करून एकूण स्क्रीन टाइम मॅनेजमेंट ज्याला त्याला करता यावी यासाठी प्रयत्न करताना दिसते.
त्यातलाच भाग म्हणजे आपल्या स्मार्ट फोनमध्ये असलेलं ‘स्क्रीन टाइम’ हे फिचर! - कुठे असतं हे फिचर? फोनच्या सेटिंगमध्ये जा. त्यात तुम्हाला डिजिटल वेल बीइंग अँड पेरंटल कंट्रोल असा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक केलंत की ॲप टायमर असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यात तुमच्या फोनमध्ये असलेल्या सगळ्या ॲप्सची लिस्ट असते. आणि कुठल्या ॲपचा तुमचा स्क्रीन टाइम किती आहे हेही तुम्हाला सहज समजू शकतं.
उदा. लिस्टमधल्या व्हॉट्सॲपवर क्लिक केलंत की व्हॉट्सॲपवर तुम्ही रोज किती वेळ देता आणि आठवड्याला किती वेळ व्हॉट्सॲपवर असता याचे तपशील मिळू शकतात. शिवाय यात स्क्रीन टाइम किती होता हे तर कळतंच पण, तुम्हाला किती नोटिफिकेशन्स आल्या, म्हणजे किती मेसेज व्हॉट्सॲपवर आले, किती वेळा तुम्ही व्हॉट्सॲप उघडलंत हेही समजू शकतं. शो नोटीफिकेशन असा पर्याय आहे, तो चालू केला की सगळे नोटिफिकेशन दिसतात. तो बंदही करण्याची सोय आहे. शिवाय त्यात एक भलीमोठी फिचर्सची लिस्ट आहे. त्यातल्या कशाचे नोटिफिकेशन्स चालू ठेवायचे आणि कशाचे बंद करायचे हे ठरवू शकता.
स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी असा आपल्याच फोनने आपल्या ऑनलाइन वर्तणुकीचा तयार केलेला डेटा वापरता येऊ शकतो. आपण ऑनलाईन गेल्यानंतर नक्की काय काय करतो, कशासाठी किती वेळ देतो हे बघून त्यानुसार कुठल्या ॲपवरचा किती वेळ आपण कमी करू शकतो हे ठरवू शकतो. स्क्रीन टाईम कमी करणं ही आपणच करायची गोष्ट आहे, बाहेरून दुसरं कुणीही आपल्यासाठी ती करू शकणार नाही. त्यामुळे आपल्याच फोनने, ॲप्सने दिलेले पर्याय वापरून आपणच आपला स्क्रीन टाइम कमी करायला हवा.