गेल्या काही वर्षांत 0.8, 1.3 मेगापिक्सलच्या मोबाईल कॅमेराने सध्याच्या बाजारात असलेल्या 48 मेगापिक्सल कॅमेरा एवढी मोठी झेप घेतली आहे. मात्र, आता मोबाईल कंपन्यांना जास्त मेगापिक्सलच्या कॅमेरांचे वेध लागले असून सेल्फी, फोटोग्राफीचा छंद असणाऱ्यांसाठी जास्त मेगापिक्सलचे कॅमेरे बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे काही महिन्यांपूर्वीच लाँच झालेल्या 48 मेगापिक्सल कॅमेराच्या मोबाईलची हवाच निघून गेली आहे.
या कॅमेरांची निर्मिती करण्यात सॅमसंग आघाडीवर असून या कॅमेरांचा वापर मात्र, शाओमी, ओप्पो सारख्या कंपन्या करत आहेत. सॅमसंगने नुकतेच A- सीरीजचे 8 स्मार्टफोन लाँच केले आहेत. या सिरीजमध्ये आणखी एक Galaxy A90 फोन लाँच होणार आहे. यानंतर कंपनी पुढील वर्षी Galaxy A21, A31, A41, A51, A61, A70, A81 आणि A91 सिरीज लाँच करेल. या A91मध्ये सॅमसंग त्यांचा तब्बल 108 मेगापिक्सलचा कॅमेरा लाँच करणार आहे.
पुढील वर्षी लाँच होणारे स्मार्टफोन हे ट्रिपल कॅमेरावाले असतील. याबाबत एका ट्विटर खात्यावर माहिती देण्यात आली आहे.
पुढील वर्षी येणाऱ्या मोबाईलमध्ये 13 मेगापिक्सलपासून कॅमेरा सुरू होणार आहेत. तर ए51 पासून टेलिफोटो कॅमेरा देण्यात येईल. ए 61 मध्ये 48 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात येईल. ए 81 मध्ये 64 तर ए 91 मध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्याची शक्यता आहे.
रेडमीने नुकतेच 64 मेगापिक्सलचा कॅमेरा फोन येत असल्याचे म्हटले होते. यामुळे सहा महिन्यांतच 48 मेगापिक्सलची क्रेझ संपल्याचे चित्र असून वनप्लसही पुढील फोनमध्ये 64 मेगापिक्सल कॅमेरा देण्याची शक्यता आहे. याचीच री ओप्पोसारख्या कंपन्या ओढणार आहेत.