फोनमध्ये आग लागण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. गेल्या आठवड्यात झालेल्या वनप्लस नॉर्ड 2 स्फोटात ग्राहकाचा पाय भाजला. त्यामुळे फक्त वनप्लस युजर्स नव्हे तर इतर स्मार्टफोन युजर्सची भीती वाढली आहे. अशा प्रसंगी स्मार्टफोनवर चाचण्या केल्या आहेत त्यामुळे आगीला ग्राहक कारणीभूत असल्याचा दावा स्मार्टफोन कंपन्या करतात. परंतु फोन ब्लास्ट होण्यामागे अनेक कारणं असू शकतात.
यात कंपनीचा देखील दोष असू शकतो, याचे मोठे उदाहरण म्हणजे Samsung Galaxy Note 7 चे आहे. जरी कंपनीने नुकसान भरपाई दिली तरी आपला डेटा, स्मार्टफोनमधील आठवणी आणि काही वेळा जीवाची होणारी हानी कंपन्या भरून देऊ शकत नाहीत. त्यामुळे आपल्या स्मार्टफोनची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. पुढे आम्ही याचीच माहिती दिली आहे, चला जाणून घेऊया स्मार्टफोनचा स्फोट टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी ते:
- फोनची काळजी घ्या
फोन उंचावरून वारंवार पडल्यामुळे बॅटरीचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे फोनची काळजी घ्या. फोन पडल्यास बॅटरीमध्ये बिघाड होऊ शकतो. तसेच शॉर्ट-सर्किट, ओवरहीटिंग इत्यादी कारणांमुळे बॅटरीचा स्फोट होऊन आग लागू शकते.
- अधिकृत बॅटरी आणि चार्जर वापरा
जेव्हा जुनी बॅटरी बदलायची असेल तेव्हा कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन अधिकृत बॅटरी बदलून घ्यावी. अनेकदा फोनच्या स्फोटात अनधिकृत चार्जर वापरल्याचे कारण कंपन्या सांगतात. त्यामुळे स्मार्टफोन सोबत मिळालेला चार्जर वापरणे केव्हाही चांगले. थर्ड-पार्टी चार्जर तुमच्या फोन व्यवस्थित चार्ज करत नाही तसेच त्यामुळे तुमचा फोन हिट देखील होऊ शकतो.
- रात्रभर फोन चार्ज करणे टाळा
रात्रभर फोन चार्ज केल्यास फोनच्या बॅटरीचे स्वास्थ्य बिघडू शकते. बॅटरी फुगू शकते, ओव्हरहीटिंग, शॉर्ट सर्किटमुळे फोनचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे बॅटरी फुल चार्ज झाल्यावर किंवा 90 ते 95 टक्के चार्ज झाल्यावर चार्जिंगवरून काढावा. काही फोन आपोआप चार्जिंग बंद करतात परंतु सर्वच फोन्समध्ये हे फिचर नसते.
- तापमानाची काळजी घ्या आणि पाण्यापासून फोन दूर ठेवा
फोन दीर्घकाळ वापरल्यास किंवा हेवी टास्कसाठी फोन वापरल्यास फोन गरम होतो. तसेच थेट उन्हात फोन राहिल्यास फोन गरम होऊन स्फोट होऊ शकतो. त्यामुळे फोन जास्त हिट होणार नाही याची काळजी घ्यावी. फोन हेवी टास्कमुळे हिट झाल्यास काही काळ विश्रांती द्यावी.
तसेच फोनमध्ये पाणी गेल्यास बॅटरी आणि फोनच्या अन्य कॉम्पोनंट्समध्ये बिघाड होऊ शकतो. त्यामुळे फोन पाण्यापासून दूर ठेवावा. काही फोन वॉटरप्रूफ असतात परंतु सर्वच मोबाईलमध्ये ही सोय मिळत नाही.