नारायण बडगुजर
पिंपरी - विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच अचानक एका उमेदवाराचे फेसबुक अकाउंट हॅक झाले. अकाउंटवर फोटो, माहिती अपलोड करता येत नव्हती. तसेच पासवर्ड बदलण्याचा प्रयत्न केला असता हॅकरने अकाउंट डिलीट केले. त्यानंतर संबंधितांनी पोलिसांच्या सायबर सेलकडे धाव घेतली. खोडसाळपणा किंवा राजकीय सूड उगवून बदनामी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत असल्याचे समोर आले. फेसबुक अकाउंटचा पासवई सुरक्षित नसल्यास ते हॅक होऊ शकते, ही बाब पुन्हा एका स्पष्ट झाली.
स्मार्टफोनचा प्रत्येक वापरकर्ता सोशल मीडियाचा वापर करीत असतो. याला शिक्षणाची कोणतीही अट नाही. त्यामुळे सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. यात फेसबुक, व्हॉट्सअप, टिकटॉक, यूट्युब, इंस्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आदी वेबसाईट व अॅप्लिकेशनचा यात समावेश आहे. यातील फेसबुक जगभरात लोकप्रिय आहे. त्यामुळे स्मार्टफोनचे बहुतांश वापरकर्ते ‘फेसबुक’वर असल्याचे दिसून येते. मात्र यातील प्रत्येकालाच फेसबुकच्या वापराबाबत पूर्ण माहिती असेलच असे नाही. त्यामुळे अशा वापरकर्त्याकडून खबरदारीच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करण्यात येते. परिणामी त्यांचे अकाउंट हॅक होण्याची शक्यता असते.
फेसबुक अकाउंटमध्ये आपली जन्मतारीख, जन्मस्थळ, आपले गाव, जिल्हा, भाषा, शाळा, महाविद्यालय, कंपनी किंवा नोकरीचे ठिकाण तसेच व्यवसाय, आपले नातेवाईक तसेच स्वत:चा मोबाइल क्रमांक किंवा ई-मेल आयडी आदी खासगी माहिती नमूद केलेली असते. यातील काही माहितीचा उपयोग अकाउंटच्या पासवर्डसाठी केला जातो. हॅकर नेमका याचाच गैरफायदा घेतात. संबंधित अकाउंटवरील माहितीचा पासवर्ड म्हणून त्यांच्याकडून वापर केला जातो. यातील काही माहिती आणि पासवर्ड एकच असल्याने अकाउंट त्यांच्याकडून हॅक होते. त्या माध्यमातूत अशा अकाउंटवर अश्लील फोटो, व्हिडीओ अपलोड केले जातात. तसेच आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत केला जातो. तसेच अकाउंटधारकाची बदनामी करण्याचाही प्रयत्न केला जातो. तरुणी किंवा महिलांच्या फोटोचा गैरवापर केला जातो. यातून त्यांची बदनामी करण्याचाच हेतू असल्याचे बहुतांश प्रकरणांत समोर आले आहे.
बनावट फेसबुक अकाउंट तयार केले
अशाच एका प्रकरणात एका महिलेच्या नातेवाईक असलेल्या तरुणीने संबंधित महिलेच्या नावाने फेसबुक अकाउंट केले, त्यावर संबंधित महिलेचे पतीसह असलेले खासगी आयुष्यातील फोटो पोस्ट केले. तसेच ती महिला नोकरीला असलेल्या कार्यालयातील इतर सहकाऱ्यांना फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविली. ही बाब संबंधित महिलेला माहीत झाली. पोलिसांच्या सायबर सेलकडे याबाबत तक्रार करण्यात आली. नातेवाईक असलेल्या तरुणीने किरकोळ कारणावरून झालेल्या गैरसमजातून बनावट फसेबुक अकाउंट तयार करून खोडसाळपणा केल्याचा प्रकार समोर आला.
काय काळजी घ्याल?
- फेसबुकच्या सेटींगमध्ये अॅप्सचे सेटींग असते. त्यात जाऊन अनावश्यक अॅप्स काढून टाकावेत. मोबाइल, लॅपटॉप किंवा कम्प्युटरमध्ये लायसन्स कॉपीचा अॅन्टीव्हायरस असावा. टू स्टेप व्हेरिफिकेशन अर्थात ड्युअल स्टेज सेटींग करावी. जेणेकरून अकाउंट हॅक करायचा प्रयत्न झाल्यास त्याबाबत तुम्हाला ओटीपी येऊन त्याबाबत माहिती मिळते.
- सेटींगमध्ये ‘अॅड ट्रस्टेड कॉन्टॅक्टस’ हा एक ऑप्शन आहे. त्यामुळे विश्वासू पाच जणांना त्यात अॅड करावे. त्यामुळे अकाउंट हॅक झाल्यानंतरही या कॉन्टॅक्टसच्या माध्यमातून पासवर्ड बदलून हॅकिंग टाळता येते.
- पासवर्डसाठी २४ डिजीट वापरता येतात. तो स्ट्राँग असावा. त्यासाठी किमान आठ डिजीट वापरावेत. त्यात हॅशटॅग, नंबर, स्मॉल तसेच कॅपीटल अल्फाबेट अशी सांकेतिक चिन्ह असावीत. पासवर्ड एक ते दीड महिन्याने बदलत राहावे.
- आपले नाव, कुटुंबातील सदस्याचे नाव, गाव, कंपनी, कामाचे ठिकाण, शाळा, तसेच महाविद्यालयाचे नाव, जन्म तारीख, मोबाइल क्रमांक, पोस्टाचा पीन कोड याचा पासवर्ड म्हणून उपयोग करु नये. ही माहिती आपल्या अकाउंटवर नमूद केलेली असते. त्यामुळे हॅकरला पासवर्ड सहज उपलब्ध होतो.
- ओळखीच्याच व्यक्तिची फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारावी. तसेच अकाउंटवरील आपली माहिती, फोटो यांना आपल्या मित्रांशिवाय कोणीही पाहू शकणार नाही, अशी ‘प्रायव्हसी सेटींग’ करावी.
पासवर्ड, लोकेशन शेअर करू नये
आपण प्रवासात असल्याचे किंवा हॉटेल तसेच घराबाहेर असल्याचे लोकेशन शेअर करू नये. ‘फेसबुक लाईव्ह’ देखील टाळावे. जेणे करून आपण कोठे आहोत, याबाबत अनोळखी व्यक्तींना किंवा आपल्यावर पाळत ठेवून असलेल्या गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींना माहिती होणार नाही. तसेच आपला पासवर्ड कोणालाही देऊ नये किंवा शेअर करु नये. अशावेळी पासवर्डचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक असते.
- सुधाकर काटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर सेल, पिंपरी-चिंचवड
प्रायव्हसी सेटिंगचा पुरेपूर वापर करावा
फेसबुकने प्रायव्हसी सेटिंग उपलब्ध करून दिले आहे. त्याचा पुरेपूर वापर केला पाहिजे. फेसबुकवरील विविध अॅप्स काढून टाकावेत. अशा अॅप्सच्या माध्यमातून आपले पासवर्ड तसेच खासगी माहितीचा हॅकरला अॅक्सेस मिळतो. तसेच अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नये. त्यापुळे काही मालवेअर किंवा स्पायवेअर आपल्या मोबाइलमध्ये येतात व आपले पासवर्ड हॅकरपर्यंत पोहचवितात.
- संदीप गादीया, सायबर क्राइम इनव्हेस्टिगेशन एक्स्पर्ट