नवी दिल्ली : वर्षभरापूर्वीच ब्लूव्हेलने पालकांची झोप उडविली असताना आता मोमो चॅलेंज या नव्या गेमने पुन्हा मुलांना आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली आहे. या गेममुळे गेल्या काही दिवसांत मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. यामुळे महिला आणि बाल विकास मंत्रालयाने या जीवघेण्या मोमो चॅलेंजपासून मुलांना लांब कसे ठेवायचे याबद्दल काही उपाय सुचविले आहेत. यामुळे आपल्या पाल्याला अशा गेम्सपासून वाचविण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे.
पहिली आणि महत्वाची खबरदारी घ्यायची म्हणजे, मुलासमोर मोमो चॅलेंज किंवा त्यासारख्या कोणत्याही गेमचे नाव न घेणे. बऱ्याचदा मुलांसमोर त्यांचे पालक एकमेकांसोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत अशा चर्चा करतात. यावेळी मुले हे संभाषण ऐकत असतात. यामुळे ही नावे टाळावीत. वृत्तपत्रे किंवा बातम्यां पाहत असताना काहीवेळा या गेमबाबत सांगितले जाते. अशावेळी दुसरा चॅनल लावावा. ही खबरदारी मुलाला त्या गेमविषयी माहिती नसल्यास घ्यावी.
जर पाल्याचा मूड ठीक नसेल, किंवा जवळच्यांशी बोलत नसेल म्हणजेच त्याच्या स्वभावात फरक जाणवत असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवावे. तसेच त्याने अंगावर कुठे धारधार वस्तूने ओरखडे मारले आहेत का ते ही पहावे. असे ओरखडे किंवा जखमा असल्यास मुलगा मोमो चॅलेंजसारख्या जीवघेण्या ऑनलाईन गेम्सच्या आहारी गेला असल्याचे ओळखावे. तसेच मुलाच्या इंटरनेटवरील हालचाली, सोशल साईटवरील पोस्ट आदी गोष्टीही तपासाव्यात.
आपले पाल्य अशा कोणत्याही गेमच्या आहारी गेल्याचे आढळल्यास एखाद्या तज्ज्ञाकडे जाण्यापासून अजिबात संकोचू नका. या व्यसनातून मुलाला बाहेर काढणे महत्वाचे आहे. नवे फोन नंबर, इमेल आयडी यावरदेखील मोमोने पाठविलेले चॅलेंज असू शकतात. पश्चिम बंगालमध्ये मोमोमुळे दोन मुलांनी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. एक 18 वर्षांचा तर दुसरी मुलगी ही 26 वर्षांची होती.
मोमो गेम हा ब्लूव्हेलची सुधारित आवृत्ती आहे. गेल्या वर्षी ब्लूव्हेल या गेमनेही धुमाकूळ घातला होता. मोमो हा मुलांना वेगवेगळ्या स्वरुपात टास्क पाठवत असतो. हे टास्क पाठविणारा ओळखीचाही नसतो. यामधील सर्व चॅलेंज पूर्ण केल्यावर जीव देण्याचे चॅलेंजही दिले जाते. यानंतर हा गेम संपतो. यामुळे पालकांनी वेळीच सावध झाले पाहिजे.
मुलांना लहान वयात मोबाईल देणे कितपत योग्य?बऱ्याचदा आपण लहान मुलांना शांत करण्यासाठी मोबाईल हातात देतो. सुरुवातीला तो गाणी ऐकतो. नंतर मोबाईलबाबत कळायला लागल्यावर तो इंटरनेट वापरायला लागतो. आपण या गोष्टीचे कौतुक करतो. इथेच पहिली चूक होते. तो नंतर गेम डाऊनलोड करायला लागतो आणि खेळतो. यामध्ये असे जीवघेणे गेमही असू शकतात. गुगल असे गेम शोधून ते प्ले स्टोअरवरून डिलीट करते. मात्र, शोधेपर्यंत मुलाच्या हाती तो गेम लागला असेल तर काय? यामुळे मुलांना लहान वयात मोबाईल देणे कितपत योग्य ते पालकांनीच ठरवावे.