मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशीदींवरील भोंग्यांवरून आपली शेवटची भूमिका स्पष्ट केली आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रक जारी करत राज्य सरकार, मनसे कार्यकर्ते, पोलीस आणि सामान्य नागरिकांना आवाहन केले आहे. याचबरोबर ज्या मशीदींनी भोंगे काढले, त्यांचेही आभार मानले आहेत. या पत्रकात राज यांनी डेसिबलची मर्यादा किती घातलेली आहे याची उदाहरणे दिली आहेत.
असे असले तरी तुम्ही देखील कोणत्याही यंत्रणेशिवाय आवाजाची तीव्रता मोजू शकता. डेसिबलमध्ये ही तीव्रता मोजली जाते. यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल वापरू शकणार आहात. गुगल अॅपवर अनेक अॅप आहेत जी तुम्हाला आवाजाची तीव्रता मोजण्यास मदत करतात. मोबाईलमध्ये ट्रस्टेड अॅप, हाय रेटिंगची किंवा चांगल्या कमेंट असणारी अॅप तुम्ही डाऊनलोड करू शकता. याद्वारे तुम्ही लाऊडस्पीकर किंवा डीजे आदींच्या आवाजाची तीव्रता मोजू शकता.
मुंबई पोलिसांनी १२ मार्च २०२२ ला एक आदेश काढला होता. यामध्ये पोलीस यापुढे कोणत्याही फ्री आवाज तीव्रता मोजणी अॅपद्वारे नोंदविलेली तीव्रता ग्राह्य धरणार असल्याचे म्हटले होते. त्यापूर्वी National Environmental Engineering Research Institute (NEERI) ने बनविलेल्या मोबाईल अॅपवर नोंदविलेल्या आवाजाच्या तक्रारी पोलीस नोंदवून घेत होते.
तुम्ही कोणता डाऊनलोड कराल...तुम्हाला एखाद्या लाऊडस्पीकरचा किंवा कार्यक्रमातून येत असलेला गोंगाट मोजायचा असेल आणि पोलिसांत तक्रार करायची असेल तर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर decibel meter, noise meter किंवा NEERI असे सर्च करावे. याद्वारे चांगले डाऊनलोड झालेली, कमेंट असलेली अॅप डाऊनलोड करावीत. सध्या अशा अॅपना मागणी मोठी असल्याने फेक अॅप किंवा फ्रॉड करणारी अॅपदेखील ट्रेंडमध्ये येऊ शकतात. यामुळे ही अॅप डाऊनलोड करताना खबरदारी घ्यावी.
मुंबई पोलीस आयुक्त काय म्हणालेले...“नागरिक कोणतेही मोफत ध्वनी मीटर डाउनलोड करू शकतात, त्यांच्या फोनवर डेसिबल पातळीचे रीडिंग घेऊ शकतात आणि स्थानिक पोलिसांच्या ट्विटर खात्यावर पाठवू शकतात किंवा 100 वर तक्रार नोंदवू शकतात. उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि बांधकाम साइट्ससाठी आवाजाचे नियम लागू केले जातील. अंमलबजावणी केली आहे,” असे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सांगितले होते.