होळी किंवा रंगपंचमीची मजा अनेकांना सोशल मीडियावर पोस्ट करायची असते. अशावेळी स्मार्टफोन भिजण्याची शक्यता जास्त असते. तसेच कधी-कधी तुमच्या नकळत देखील तुमच्यावर पाणी टाकलं जातं, यात मित्रांची मजा तर होते परंतु तुमच्या स्मार्टफोनला सजा भोगावी लागते. अशावेळी स्मार्टफोनचं होणारा नुकसान टाळायचं असेल तर पुढील उपाय करा.
पाऊच
तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला लॅमिनेट देखील करू शकता. परंतु ही खर्चिक प्रक्रिया आहे. त्याऐवजी तुम्ही प्लास्टिक पाऊचचा वापर करू शकतात. हे पाऊच होळीच्या काळात तसेच वॉटर पार्क, रिसॉर्ट किंवा पाण्याच्या ठिकाणी जाताना मदत करेल.
सेलो टेप
जर तुम्हाला पाऊच विकत घ्यायचं नसेल तर तुम्ही घरातील सेलो टेपची देखील मदत घेऊ शकता. जे पार्टस ओपन आहेत आहेत तिथे तुम्ही सेलो टेप लावू शकता. यात माईक, चार्जिंग पोर्ट, हेडफोन जॅक, स्पिकर इत्यादींचा समावेश आहे. सिम ट्रे आणि बटन्सना देखील सेल टेपची सुरक्षा देता येईल.
स्मार्टफोन स्विच ऑफ करा
तुमचा मोबाईल भिजला किंवा त्यावर पाणी पडलं तर त्वरित तो स्विच ऑफ करावा. त्यामुळे स्मार्टफोनच्या आत शॉर्ट सर्किट होऊन होणारं नुकसान टाळता येतं. स्मार्टफोन भिजल्यावर तो चालू आहे कि नाही हे बघत बसू नका. स्मार्टफोन थेट बंद करून टाका. सिम आणि मेमरी कार्ड काढून फोन पंख्याखाली किंवा हेयर ड्रायरनं सुकवा. हेयर ड्रायर जवळ ठेऊन स्मार्टफोन जास्त गरम करू नका.
कपड्यानं पुसून घ्या
फोनच्या बाहेरील बाजूस असलेलं पाणी कपड्यानं किंवा पेपर नॅपकिननं पुसून घ्या. तुमच्याकडे हेयर ड्रायर नसेल तर सुक्या तांदळात निदान 24 तास स्मार्टफोन ठेवा. हेडफोन जॅक किंवा सिम कार्ड ट्रे मध्ये तांदळाचे दाणे अडकणार नाहीत याची काळजी घ्या.