नवी दिल्ली - आधार कार्ड हे प्रत्येक कामासाठी उपयोगी पडतं. तसेच सरकारी योजनांसोबत ते लिंक करणं गरजेचं झालं आहे. मात्र आता आधार कार्डच्या मदतीने एटीएमप्रमाणे पैसे देखील काढता येणार आहेत. मात्र यासाठी आधार कार्ड बँक अकाऊंटशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे. ग्राहक Aadhaar इनेबल्ड पेमेंट सिस्टम सर्व्हिसद्वारे (AePS) बँकेत जमा असलेली रक्कम काढू शकतात. त्यामुळे देशात आता एटीएम कार्ड, पीनशिवाय बँकिंग व्यवहार करता येणार आहेत.
कसे काढता येणार पैसे
पैसे काढण्यासाठी आतापर्यंत सर्वच जण एटीएम-डेबिट कार्डच्या मदत घेत होते. पण आता हेच काम आधार कार्डच्या साहाय्याने करता येणार आहे. Aadhaar आधारित ATM मशीनद्वारे पैसे काढता येणार आहेत.
पैसे काढण्याशिवाय, पैसे भरण्यासाठी अर्थात कॅश डिपॉजिट, बॅलेन्स चेक करणं, मिनी स्टेटमेंट काढणं आणि याद्वारे कर्ज देखील घेता येणार आहे. यासोबत पॅन कार्ड, ई-केवायसी आणि कर्ज वितरणाच्या सुविधाही याच्यामार्फत दिल्या जाणार आहेत.
Aadhaar आधारित पेमेंट (AEPS) नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) तयार केलं आहे. याद्वारे बँक आणि वित्तिय संस्था आपल्या सेवा देण्यासाठी आधार नंबर आणि यूआयडीएआय (UIDAI) ऑथेंटिकेशनचा वापर करतात. याला आरबीआयची (RBI) देखील मान्यता मिळाली आहे. या सुविधेअंतर्गत ग्राहकांचा मोबाईल नंबर आणि फिंगरप्रिंट, डेबिट कार्डप्रमाणे काम करतं. त्यामुळे पीन नंबरही टाकावा लागणार नाही.
- आधार मायक्रो एटीएम संशोधित POS (पॉइंट ऑफ सेल) डिव्हाईसप्रमाणे काम करतं.
- पीनलेस बँकिंगला प्रोत्साहन देणं हा यामागचा उद्देश आहे.
- याप्रकारच्या ट्रान्झेक्शनवर कोणताही चार्ज लागत नाही.
- एटीएमप्रमाणे यात कॅश-इन आणि कॅश-आऊट होणार नाही, तर आधार मायक्रो एटीएमद्वारा हे चालवलं जाईल.
बँक अकाऊंट हे आधार कार्डसोबत लिंक केलेलं असलेली प्रत्येक व्यक्ती या सुविधाचा लाभ घेऊ शकणार आहे. अद्याप तुम्ही लिंक केलं नसल्यास जवळच्या शाखेत जाऊन ते करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.