HP ने आपला 11-इंचाचा टॅबलेट पीसी अधिकृतपणे सादर केला आहे. या टॅबलेटमध्ये कंपनीने Windows 11 सपोर्ट दिले आहे, त्यामुळे हा कंपनीचा सर्वात पहिला विंडोज 11 टॅबलेट पीसी ठरला आहे. परंतु या टॅबलेटची आणखीन एक खासियत याला जगावेगळी बनवते. ती म्हणजे या टॅबच्या वरच्या बाजूला मिळणारा रोटेटेबल कॅमेरा. हा जगातील पहिला टॅबलेट आहे जो रोटेटेबल कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे, असा दावा या अमेरिकन कंपनीने केला आहे.
HP 11-inch tablet PC चे स्पेसिफिकेशन
नावाप्रमाणे HP 11-inch tablet PC मध्ये 11-इंचाचा टच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा आयपीएस पॅनल 2160x1440 म्हणजे 2K रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या डिस्प्लेला कॉर्निग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. या टॅबलेटसह एक डिटॅचेबल कीबोर्ड देखील देण्यात येईल.
प्रोसेसिंगसाठी या अनोख्या टॅबलेट पीसीमध्ये कंपनीने क्वॉड-कोर Intel Pentium Silver N6000 SoC देण्यात आली आहे. ग्राफिक्ससाठी यात Intel UHD ग्राफिक्स कार्डचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर यात 4GB LPDDR4RAM आणि 128GB M.2 PCIe NVMe SSD स्टोरेज मिळते.
एचपीच्या टॅबलेट पीसीच्या वरच्या बाजूला असलेल्या फ्लिप कॅमेऱ्याचे रिजोल्यूशन 13MP आहे. हा कॅमेरा फ्रंट आणि रियर अश्या दोन्ही कॅमेऱ्यांची जबाबदारी सांभाळू शकतो. कनेक्टिव्हिटीसाठी या टॅबलेटमध्ये Intel Wi-Fi 6 AX201, ब्लूटूथ 5.0, एक USB-C पोर्ट आणि एक मायक्रोएसडी कार्ड रीडर देण्यात आला आहे. यात तीन स्पीकर आणि फिंगरप्रिंट रीडर देखील देण्यात आला आहे. या टॅबलेट पीसीमध्ये एचपीने 32.2Wh ची बॅटरी दिली आहे.
HP 11-inch tablet PC ची किंमत
HP चा 11 इंचाचा टॅबलेट पीसी डिसेंबरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल. या डिवाइसची किंमत 599 डॉलर पासून सुरु होईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. ही किंमत सुमारे 44,000 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. परंतु हा टॅब भारतासह जगभरात कधी उपलब्ध होईल याची माहिती मात्र अजूनही समोर आली नाही.