HP नं भारतात आपल्या लॅपटॉप पोर्टफोलियोचा विस्तार करत Spectre x360 16 (2022) आणि x360 13.5 हे दोन प्रीमियम मॉडेल्स जोडले आहेत. या 2 इन 1 कन्वर्टिबल डिजाइनसह येणाऱ्या लॅपटॉप्समध्ये Intel Arc Graphics सह 12th Gen Intel Core प्रोसेसर देण्यात आले आहेत. तसेच 4K OLED डिस्प्ले, 16 तासांचा बॅटरी बॅकअप आणि मॅग्नेटिक MPP 2.0 टिल्ट पेन असे फीचर्स देखील मिळतात.
किंमत आणि उपलब्धता
सीरिजमधील 16 इंचाच्या मॉडेलची किंमत 1,39,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 13.5 इंचाच्या व्हेरिएंटसाठी तुम्हाला 1,29,999 रुपये मोजावे लागतील. सध्या यांची प्री-बुकिंग कंपनीच्या वेबसाईटवरून सुरु करण्यात आली आहे. यांची खरेदी तुम्ही 18 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआयसह करू शकता. हलक्या पितळी छटेसह नाइटफॉल ब्लॅक आणि सेलेस्टिअल ब्लू छटेसह नॉक्टर्न ब्लू अशा दोन आकर्षक रंगसंगतीमध्ये हे लॅपटॉप उपलब्ध झाले आहेत.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
कंपनीच्या या दोन्ही लॅपटॉपमध्ये टचस्क्रीन असलेला 4K OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. लॅपटॉपची खासियत म्हणजे यात पिंच-टू-झूम आणि डबल टॅपसह प्रेस एन्ड होल्ड टू ड्रॉ स्केच सारखे फिचर मिळतात. लॅपटॉपमध्ये बॅकलिट कीबोर्ड आणि मोठ्या ट्रॅकपॅडसह टॉप बेजलमध्ये वेबकॅम मिळतो. यात 12th जेनरेशन इंटेल कोर i7 प्रोसेसर मिळतो.
एआय पावर्ड असलेले हे लॉपटॉप एचपी ऑटो फ्रेम कॅमेऱ्यासह येतात जो तुम्ही कुठेही असलात तरी फोकसमध्ये ठेवतो. तुमच्या मागे कोणी आल्यास या लॅपटॉपची स्क्रीन ब्लर किंवा धूसर होते. तुम्ही लॅपटॉपपासून दूर गेल्यावर स्क्रीन लॉक होते आणि वेक ऑन अप्रोच यासारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. छोटे ब्रेक घेता यावेत यासाठी स्क्रीन डिस्टन्स रिमाइंडर आणि स्क्रीन टाइम रिमाइंडर यासाखी हेल्थ अँड बीइंग फीचर्स देखील आहेत.
बॅटरी पाहता दोन्ही लॅपटॉपमध्ये खूप पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी सिंगल चार्जवर 16 तास वापरता येते. लॅपटॉपमधील बॅटरी फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते, जी 30 मिनिटांत 50% पर्यंत चार्ज करते. कनेक्टिव्हिटीसाठी लॅपटॉपमध्ये एक HDMI पोर्ट, एक टाइप A पोर्ट, एक टाइप-C पोर्ट आणि मायक्रो एसडी कार्ड रीडर व्यतिरिक्त एक 3.5mm हेडफोन जॅक देखील देण्यात आला आहे.