एचटीसी कंपनीने यू१२ प्लस हे मॉडेल बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात चार कॅमेर्यांसह अनेक उत्तमोत्तम फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. गत अनेक दिवसांपासून एचटीसी यू१२ प्लस या मॉडेलचा आगमनाबाबत उत्सुकता लागली होती. याचे अनेक फीचर्सदेखील लीक झाले होते. या पार्श्वभूमीवर, एचटीसी कंपनीने आपल्या या आगामी फ्लॅगशिप मॉडेलचे अनावरण केले आहे. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे याच्या पुढे आणि मागे प्रत्येकी दोन असे एकंदरीत चार कॅमेरे देण्यात आले आहेत. यात मागील बाजूस एक कॅमेरा हा वाईड अँगलयुक्त १२ मेगापिक्सल्स आणि १.४ मायक्रॉन पिक्सल्स साईजचा तसेच एफ/१.७५ अपर्चरयुक्त असेल. तर दुसरा कॅमेरा टेलीफोटो लेन्स या प्रकारातील असून तो १६ मेगापिक्सल्सचा, १.० मायक्रॉन पिक्सल्स साईजचा, एफ/२.६ अपर्चरयुक्त असेल.
यात २ एक्स ऑप्टीकल झूम तर १० एक्स डिजिटल झूम देण्यात आला आहे. यात अल्ट्रास्पीड ऑटो-फोकस २ म्हणजेच फेज डिटेक्शन+लेसर ऑटो-फोकस, ड्युअल एलईडी फ्लॅश, प्रो मोड, ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन, एआर स्टीकर्स, फेस डिटेक्शन, पॅनोरामा आदी फिचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये ६० फ्रेम्स प्रति-सेकंद या गतीने फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करणे शक्य आहे. तसेच यात २४० फ्रेम्स प्रति-सेकंद या गतीने सुपर-स्लो मोशन या प्रकारातील चित्रीकरण करता येणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी याच्या पुढील बाजूस प्रत्येकी ८ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे दिले असून याची साईज १.२ मायक्रॉन पिक्सल्स व अपर्चर एफ/२.० असेल.
एचटीसी यू१२ प्लस या मॉडेलमध्ये ६ इंच आकारमानाचा आणि क्वाड-एचडी प्लस (२८८० बाय १४४० पिक्सल्स) क्षमतेचा, १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा, बेझललेस (कडा विरहीत) सुपर एलसीडी डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरणे दिलेले आहे. याच एचटीसीने विकसित केलेले एज सेन्स फिचर देण्यात आले आहे. याच्या मदतीने टचस्क्रीन डिस्प्लेस स्पर्श न करतांनाही फक्त कडांना हाताने दाबून फोटो काढणे, कोणतेही अॅप कार्यान्वित करणे आदी फंक्शन्स पार पाडता येतात. एवढेच नव्हे तर याच पध्दतीचा वापर करून कुणीही समोरील व्यक्तीस टेक्स्ट अथवा व्हॉईस मॅसेज पाठवू शकतात. याच्या जोडीला एज सेन्स-२ तंत्रज्ञान दिलेले असून याचा वापर करून स्मार्ट रोटेट, स्मार्ट डीम आदी फंक्शन्स कार्यान्वित करता येतात.
एचटीसी यू१२ प्लस स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८४५ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ६ जीबी असून स्टोअरेजसाठी ६४ आणि १२८ जीबी असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारे असून यावर एचटीसी कंपनीचा एज सेन्स हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे. क्विक चार्ज ३.० या तंत्रज्ञानाने सज्ज असणारी यातील बॅटरी ३,५०० मिलिअँपिअर क्षमतेची आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ व डस्टप्रूफ आहे. हे मॉडेल लवकरच भारतात दाखल होण्याची शक्यता आहे.