एकीकडे उपकरणे गतीमान होत असतांना त्यांचा आकारदेखील लहान होत असल्याचे आपण आधीच अनुभवत आहोत. या पार्श्वभूमिवर, आयबीएम कंपनीने जगातील सर्वात लहान आकारमानाचे कॉम्युटर तयार केले आहे. या कंपनीने आपल्या थिंक २०१८ कॉम्युटर या वार्षिक प्रदर्शीत याचे अनावरण केले आहे. ही १ मिलीमीटर बाय १ मीलीमीटर या चौरस आकारमानाची चीप आहे. १९९० च्या दशकात वापरण्यात येणार्या एक्स८६ या संगणकाच्या वेगाने ही चीप कार्य करत असल्याचे आयबीएम कंपनीने जाहीर केले आहे. यात इतक्या लहान आकारात आयबीएमने तब्बल एक दशलक्ष ट्रान्झीस्टर्सची क्षमता एकत्रीत केली आहे. खरं तर आजच्या स्मार्टफोनमध्येही याच्यापेक्षा कित्येक पटीने वेगवान कंप्युटींगह होत असते. तथापि, कमी वेग आवश्यक असणार्या युजर्सला हा संगणक लाभदायक ठरू शकतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे याचे उत्पादन मूल्य हे फक्त सात रूपयांचा आसपास आहे. यामुळे व्यावसायिक पातळीवर हा संगणक अत्यंत कमी मूल्यात उपलब्ध होऊ शकतो. याशिवाय यात ब्लॉकचेन या अद्ययावत तंत्रज्ञानाचा सपोर्टदेखील देण्यात आला आहे. यामुळे क्रिप्टोकरन्शीशी संबंधीत व्यवहारांसाठी उपयुक्त असणार्या विविध अॅप्समध्ये याचा वापर होऊ शकतो.
आयबीएमने सध्या तरी याचा फक्त प्रोटोटाईप सादर केला आहे. मात्र आगामी काळात याला व्यवसायिक पातळीवर सादर करण्याची शक्यता आहे. येत्या पाच वर्षात अशा प्रकारातील लघु संगणक बाजारपेठेत दाखल होणार असल्याचा आशावाद आयबीएम कंपनीने व्यक्त केला आहे.