मुंबई : एखादा व्यवसाय सुरु करताना तो कितपत यश मिळवेल याचे अंदाज बांधणे फारच कठीण असते. मात्र, जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर व्यवसायाला उभारी देत एका मराठमोळ्या तरुणाने चक्क फोर्ब्सच्या यादीत नाव नोंदवले आहे. सागर यरनाळकर असे या तरुणाचे नाव असून त्याने राबविलेल्या कल्पनेची दखल जगभरातील अब्जाधीशांची नावे झळकवणाऱ्या फोर्ब्सलाही घ्यावी लागली आहे.
गावागावात दूध उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. हे दूध शहरांत घरोघरी पोहचविणारेही आहेत. या दुधवाल्यांच्या जाळ्याचा पुरेपूर वापर करत या मराठमोळ्या तरुणाने घरोघरी भाजीपाला, फळे आणि किराणा माल पोहचविण्याची व्यवस्था केली आहे. ही सुविधा पोहोचवण्यासाठी सागरने डेली निंजा (DailyNinja) हे अॅप बनविले आहे. यामध्ये त्याला अनुराग गुप्ता यानेही मदत केली आहे.
सागर मूळचा ठाण्यातील असून त्याने इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयात अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. ३० अंडर ३० या फोर्ब्सच्या यादीत सागरचे नाव झळकले आहे. त्याला नोकरीनिमित्त बेंगळुरुला मित्रांसोबत राहत असताना ही कल्पना सुचली होती. आळशी मित्रांमुळे त्याला दूधवाल्यालाच ब्रेड, इडलीचे पीठ आदी वस्तू आणायला सांगावे लागायचे. यामुळे ही कल्पना प्रत्यक्षात राबविली तर, असा विचार करून मित्राच्या साथीने हा व्यवसाय सुरु केला.
देशात बहुतांश घरामध्ये सकाळी सकाळी दूध पुरविले जाते. यामुळे या दुधवाल्यांशीच करार करून त्यांच्याद्वारेच दैनंदिन वापराचे साहित्य पाठवले तर ग्राहकांनाही सकाळी उठून दुकानात जाण्याची कटकट संपेल आणि रोजगारही उपलब्ध होईल. ही योजना राबविण्यासाठी दुधवाल्यांना ऑर्डर मिळणे गरजेचे बनले. यानुसार अॅप आणले आणि ही कल्पना कमालीची यशस्वी ठरली.
फायदा काय? महत्वाचे म्हणजे महिन्याच्या महिन्याला दूधाच्या बिलाबरोबरच किराण्याचे बिल द्यावे लागते. तसेच अचानक काही संपल्यास रात्री 11 वाजेपर्यंत सांगण्याची सोय आहे. त्यामुळे सकाळी सकाळी कोणत्याही दुकानात जाण्याची गरज राहत नाही. दूधवाला येताना सोबत त्या वस्तूही पोहचवितो. बेंगळुरुमध्ये हे अॅप सुरु करण्यात आले होते. नंतर मुंबई, पुणे या शहरांमध्ये एकूण 58 हजार युजर्स आहेत. काही महिन्यांपूर्वी फोर्ब्सकडून फोन आला आणि त्यांनी कल्पना आवडल्याचे सांगितले. साडे तीन वर्षांपूर्वी हे अॅप सुरु केले होते.