नवी दिल्ली : मोबाईलवर बोलताना सारखा आवाज न येणे, किंवा थांबत थांबत आवाज येण्याने त्रस्त आहात, मग आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. ट्रायने ग्राहकांना लुबाडणाऱ्या कंपन्यांविरोधात कडक पाऊल उचलले असून आवाज थांबून थांबून येत असेल किंवा समोरच्या व्यक्तीचा आवाजच येत नसेल तर त्यालाही कॉल ड्रॉप मानले जाणार आहे. या द्वारे ट्राय या कंपन्यांना 5 लाख रुपयांचा दंड ठोठावणार आहे. या नव्या नियमाची सुरुवात 1 ऑक्टोबर 2018 ला केली जाणार आहे.
यापुर्वी ट्रायने बनविलेल्या नियमामध्ये फोनवर बोलत असताना संभाषण थांबने म्हणजेच कॉल कट होण्याला कॉल ड्रॉप समजले जात होते. मात्र, कंपन्यांनी यावर पळवाट काढून ग्राहकांना बोलतेवेळी आवाज न येणे किंवा थांबत थांबत आवाज येणे साऱख्या क्लुप्त्या शोधून काढल्या होत्या. यावर ट्रायने आता नवा नियम केला असून ही पळवाटही बंद केली आहे. यासाठी कंपन्या कमजोर नेटवर्कचे कारणही देऊ शकणार नाहीत.
टेलिकॉम कंपन्या बऱ्याचदा नेटवर्क कमजोर असल्याचे कारण देत कॉल ड्रॉपमधून अंग काढून घेत होत्या. फोनवर बोलताना आता कोणतीही समस्या आल्यास यापुढे ती कॉल ड्रॉपमध्ये मोजली जाणार आहे. महिन्यात 2 टक्क्यांपेक्षा जास्त कॉल ड्रॉप झाल्यास या कंपन्यांना 5 लाखांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे.