पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर गुगलवर 'बेस्ट टॉयलेट पेपर इन द वर्ल्ड' असे सर्च केल्यावर पाकिस्तानचा झेंडा दिसत होता. यामुळे सोशल मिडियावर पाकिस्तानची नाचक्की झाली होती. या प्रकारावर पाकिस्तानने आक्षेप घेतला होता. आता गुगलने त्यांना उत्तर पाठविले असून यामध्ये आमचा दोष नसल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरु असून सध्यातरी कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. 'बेस्ट टॉयलेट पेपर इन द वर्ल्ड' असे सर्च केल्यावर पाकिस्तानचा झेंडा दिसण्याचा दावा मिडियाने केला होता. मात्र, गुगलला असे काही सापडलेले नसल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. 14 फेब्रुवारीला ही बाब समोर आली होती.
पुलवामा हल्ल्यानंतर टॉयलेट पेपरचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. टि्वटरवर तर #besttoiletpaperintheworld मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत होता. जेव्हापासून हे फोटो व्हायरल झाले तेव्हापासून गुगल या फोटोंची रँकिंग पाहत आहे. महत्वाचे म्हणजे एकाद्या फोटोवरील किवर्ड नुसार तो फोटो सर्चमध्ये दिसतो. यासाठी अनेकदा तो शब्द वापरलेला असावा लागतो. ही रँकिंग 200 कारणांवरून ठरविली जाते.
गुगलवर एखादा शब्द सर्च केल्यानंतर चुकीचे फोटो दिसणारा हा काही पहिलाच प्रकार नाही. मध्यंतरी फेकू, पप्पू आणि इडियट सारखे शब्द सर्च केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फोटो दिसत होते. तर भिकारी शब्द सर्च केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो येत होता. कारण पाकिस्तान दिवळखोरीत निघाला होता आणि चीनचे अब्जावधी डॉलरचे कर्ज डोक्यावर आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यांना सडेतोड उत्तर द्या, असा सूर देशभरात उमटत आहे. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले आणि त्यानंतर पाकिस्तानशी सर्व संबंध तोडण्याचे कार्य सुरू झाले. देशवासीयांप्रमाणे सेलेब्रिटीनींही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आगामी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी जोर धरत आहे.