नवी दिल्ली : एखादे ठिकाण शोधायला किंवा रस्ता दाखविण्याचे काम गुगल मॅप चांगल्या पद्धतीने करतो. वाहतूक कोंडी, एकेरी वाहतूक, शहरात फ्लायओव्हरवर जायचे की सर्व्हिस रोडने जायचे याचे मार्गदर्शन केल्याने नवख्या व्यक्तीलाही वाहन मार्गक्रमण करणे सोपे जाते. आता आणखी एक महत्वाचे फिचर गुगल मॅपमध्ये येणार आहे. ते म्हणजे Speed Limits.
देशभरात लाखो किमींचे महामार्गांचे जाळे पसरलेले आहे. या प्रत्येक हायवेची वेग मर्यादा ही निश्चित केलेली असते. त्या पेक्षा जास्त वेगाने वाहन चालविल्यास वाहतूक पोलिस चलन फाडू शकतात. यापेक्षा महत्वाचे म्हणजे टायर फुटणे, वेगावरील नियंत्रण सुटल्याने अपघात होतात. भारतीय रस्ते हे जास्तीतजास्त 80 किमीच्या वेगाने जाण्यासाठी बनविलेले असतात. मात्र, सध्याची वाहने ही 120 ते 180 किमी प्रतितास एवढ्या प्रचंड वेगाने धावू शकतात. यावर आळा घालण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी गुगलने हे फिचर आणले आहे. Google Maps च्या आयओएस आणि अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर हे फिचर लाँच होणार आहे. हे फिचर राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांबरोबरच दृतगती महामार्गांवरही उपयोगाचे ठरणार आहे. गुगल मॅपवर उजव्या बाजुला खाली हे फिचर दिसणार आहे. यावर वाहन चालविणाऱ्याला त्या रस्त्याची स्पीड लिमिट किती आहे याची माहिती मिळेल.
एका माहितीनुसार हे Speed Limits फिचर भारतासाठी नसून अमेरिका, युरोप आणि डेन्मार्कसाठी उपलब्ध होणार आहे. तर भारतासाठी Speed Camera हे फिचर देण्यात येणार आहे. या फिचरमध्ये ज्या ठिकाणी स्पीड कॅमेरा असेल त्याच्या जवळ आल्यावर वाहनचालकाला सावध केले जाणार आहे. वाहतूक पोलिसांकडून वेगाने वाहने चालविणाऱ्यांच्या वाहनाचा फोटो काढून दंडाची नोटीस पाठविली जाते. हा दंड टाळण्यासाठी Google Maps चे हे Speed Camera हे फिचर उपयोगाचे ठरणार आहे.
अॅप अपडेट करायची गरज नाही....स्पीड कॅमेरा जवळ आल्यावर गुगल वाहनचालकाला आवाजाद्वारे सावध करेल. यामुळे वाहनाचा वेग कधी कमी करावा याची माहिती मिळेल. या फिचरसाठी अॅप अपडेट करण्याची गरज राहणार नाही. हे फिचर सर्व्हर साईडवरच अपलोड केले जाणार आहे. हे फिचर लवकरच उपलब्ध केले जाणार आहे.