सध्या बाजारात नव्या आयफोनची धुम आहे. आयफोनचा कॅमेरा, त्याचे फिचर्स आणि क्वालिटीची नेहमीच चर्चा असते. अनेकांना आयफोन घ्यायचा असतो, परंतू त्याची महागडी किंमत आड येते आणि लोक अँड्रॉईडवरच समाधान मानतात. भारतात एवढा आयफोनचा वापर नाही, परंतू जगात असे काही देश आहेत जिथे आयफोनची मोठी बाजारपेठ आहे. आयफोनसाठी जगातील सर्वात मोठी बाजारपेठ कोणती माहिती आहे का, तुम्ही म्हणाल अमेरिका.... तर नाही.
अॅप्पल भलेही अमेरिकेची कंपनी असेल, परंतू तिथे प्रत्येकजण आयफोन वापरत नाही. अमेरिकेत केवळ ५१ टक्के लोकच आयफोन वापरतात. उरलेल्यांपैकी २७ टक्के लोक सॅमसंग आणि इतर ब्रँड वापरतात. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची पंढरी असलेला जपान आयफोनसाठी सर्वात मोठा बाजार आहे. जपानमध्ये ५९ टक्के लोक आयफोन वापरतात. दर पाच मागे तीन जणांकडे आयफोन असतो. ९ टक्के लोक सॅमसंगचा फोन वापरतात आणि ३२ टक्के लोक दुसऱ्या ब्रँडचा फोन वापरतात. कॅनडामध्ये ५६ टक्के लोक आणि ऑस्ट्रेलियात ५३ टक्के लोक आयफोनचा वापर करतात.
मग यात भारत कुठे आहे? आयफोन वापरणाऱ्यांच्या देशांच्या यादीत भारत सर्वात तळाला आहे. भारतात आयफोन वापरणाऱ्यांची संख्या एकूण मोबाईल वापरकर्त्यांच्या ५ टक्के आहे. परंतू, या आकड्यावर जाऊ नका. कारण भारताची लोकसंख्याही या वरील देशांच्या तुलनेत खूप जास्त आहे. यामुळे हा आकडाही अॅपल कंपनीसाठी खूप मोठा आहे. भारतात १९ टक्के लोक सॅमसंगचे फोन वापरतात. तर उरलेले ७६ टक्के लोक शाओमी, व्हिवो, ओप्पो सारखे फोन वापरतात.
चीनमध्ये केवळ २१ टक्के लोक आयफोन वापरतात. तिथेही भारतासारखाच चिनी ब्रँडचा बोलबाला आहे. युकेमध्ये ४८ टक्के लोक आयफोन वापरतात. फ्रान्समध्ये ३५ टक्के, दक्षिण कोरिया आणि ब्राझीलमध्ये १८ व १६ टक्के लोक आयफोन वापरतात.