नवी दिल्ली : सोशल मीडिया कंपनी फेसबुकवर दर महिन्याला बदल्याच्या भावनेतून 'अश्लिल' फोटो, व्हिडीओ टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. दर महिन्याला याबाबत पाच लाख तक्रारी येत आहेत. फेसबुकला येणाऱ्या तक्रारींमध्ये इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप वरील तक्रारींचाही समावेश आहे.
या वर्षीच्या सुरूवातीला फेसबुकने नॉन-कन्सेंश्यूअल इंटिमेट इमेज आर्टिफिशल इंटेलिजेंस (एआई) टूल लाँच केले होते. यानुसार युजरने तक्रार करताच बदल्य़ाच्या भावनेतून केलेली अश्लिल फोटो, व्हिडीओ पोस्ट कुठून अपलोड करण्यात आली याचा थांगपत्ता लावता येतो. 2017 मध्ये कंपनीने एक प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबविला होता. युजरच्या टाईमलाईनवर अश्लिल फोटो पडताच तो हटविण्यात येत होता.
एखाद्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध तुटल्यास किंवा एकतर्फी प्रेम असल्यास त्याची बदनामी करण्याच्या उद्देशाने खासगी फोटो लीक केले जात होते. हे फोटो त्याच्या फेसबूक वॉलवर टाकले जात होते. असे फोटो टाकल्यास हा अनुभव किती भयानक असतो याचा विचार फेसबुकच्या टीमने केला होता. यामुळे त्यांनी युजरने तक्रार केल्यानंतर त्याला उत्तरे देत बसण्यापेक्षा ठोस काय कारवाई करता येईल याचा विचार करण्यात आला. यानुसार एआय बनविण्यात आले आहे.
फेसबुकने जवळपास 25 लोकांची टीम बनविली आहे. जे रव्हेंज पॉर्नविरोधात काम पाहतात. या टीमला तक्रार दाखल झाल्यानंतर लगेचच तो फोटो हटविण्याचे काम दिलेले आहे. तसेच एआयचा वापर करून अशा फोटोंचा शोध घेण्याचेही काम केले जात आहे.