फेसबुक कंपनी लवकरच व्हिडीओ चॅटींगसाठी स्वतंत्र उपकरण सादर करण्याची शक्यता असून यात टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आलेला असेल अशी शक्यता आहे.फेसबुक कंपनी लवकरच उपकरण निर्मितीत पुनरागमन करणार असल्याचे सविस्तर वृत्त ब्लूमबर्गने दिले आहे. खरं तर फेसबुक स्मार्ट स्पीकर निर्मित करत असल्याची माहिती काही महिन्यांपासून समोर आली आहे. या माध्यमातून गुगल होम आणि अमेझॉन इको या उपकरणांना तगडे आव्हान उभे करण्याची रणनिती फेसबुक कंपनीने आखल्याचे मानले जात आहे. विशेष करून मार्क झुकरबर्ग यांनी अनेकदा कृत्रीम बुध्दीमत्तेवर आधारित डिजीटल असिस्टंटबाबत उहापोह केल्यामुळे स्मार्ट स्पीकरच्या निर्मितीला दुजोरा मिळाला आहे. यातच ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये यासोबत फेसबुक व्हिडीओ चॅटींगसाठी स्वतंत्र उपकरण तयार करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यानुसार यात १३ वा १५ इंच आकारमानाचा टचस्क्रीन डिस्प्ले असू शकतो. यात इनबिल्ट व्हिडीओ कॅमेरा आणि मायक्रोफोन देण्यात आलेला असेल. यामुळे हे उपकरण सुरू करून कुणीही थेट समोरच्या व्यक्तीशी व्हिडीओ चॅटींग करू शकतो असे यात म्हटले आहे. एका अर्थाने हा व्हिडीओफोन असू शकतो. यातील कॅमेर्याला वाईड अँगल व्ह्यू प्रदान करण्यात येणार असून याच्या मदतीने समोरच्या जास्त क्षेत्रफळाला व्हिडीओ चॅटींगमध्ये कव्हर करता येईल. यात ३६० अंशाचा कॅमेरादेखील असू शकतो. मात्र पहिल्या टप्प्यात याला टाळले जाईल असे मानले जात आहे. यात वाय-फाय आणि सेल्युलर कनेक्टिव्हिटी असेल. विशेष म्हणजे हे उपकरण अँड्रॉइड प्रणालीवर चालणारे असेल. याच्या मदतीने कुणीही युजर आपल्या मित्रांशी व्हिडीओ चॅटींग करू शकतो. या बाबींचा विचार करता अमेझॉनने अलीकडेच लाँच केलेल्या इको शो या उपकरणाला फेसबुक आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे अधोरेखित झाले आहे.फेसबुक कंपनीच्या बिल्डींग ८ प्रॉडक्ट डेव्हलपमेंट प्रयोगशाळेत हे उपकरण निर्मित होत असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. वास्तविक पाहता फेसबुक आधीही उपकरण निर्मितीच्या प्रयत्नात फसले आहे. काही वर्षांपूर्वी एचटीसीच्या मदतीने त्यांनी चाचा आणि सालसा हे दोन स्मार्टफोन तयार केले होते. यात स्टेटस अपडेटसाठी एक स्वतंत्र बटन दिलेले होते. यानंतर एचटीसी फर्स्ट हे मॉडेलदेखील बाजारपेठेत दाखल झाले. फेसबुक फोन म्हणून याचा मोठा गाजावाजा झाला. मात्र हे तिन्ही मॉडेल्स ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यात अपयशी ठरले. अर्थात उपकरण निर्मितीचे प्रयत्न आधी फ्लॉप झाले आहेत. यातच फेसबुक कंपनीच्या अतिशय महत्वाकांक्षी अशा ऑक्युलस रिफ्ट या व्हिआर हेडसेटलाही फारसे यश लाभलेले नाही. या पार्श्वभूमिवर, फेसबुक स्मार्ट स्पीकर व व्हिडीओ चॅट उपकरणांबाबत प्रचंड उत्सुकतेचे वातावरण निर्मीत होणे स्वाभाविक आहे.
फेसबुक तयार करतेय व्हिडीओ चॅटींगसाठी स्वतंत्र उपकरण
By शेखर पाटील | Published: August 10, 2017 2:51 PM