6G in India : सध्या हायस्पीड इंटरनेटचे युग आहे. लोकांना फास्ट इंटरनेट सर्व्हिस हवी आहे. सध्या देशात 4G आणि 5G इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत आहे. पण, आता देश 6G इंटरनेटकडे वाटचाल करत आहे. भारत 15 ते 24 ऑक्टोबरदरम्यान दिल्ली येथे वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन सँडर्डाइजेशन असेंब्ली (WTSA) आयोजित करणार आहे. यामध्ये 190 देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. हा कार्यक्रम म्हणजे सर्व प्रतिनिधींना देशातील 6G, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मोठा डेटा यांसारख्या महत्त्वाच्या टेक्नॉलॉजीवर चर्चा करण्यासाठी एक मंच असणार आहे.
आशियामध्ये पहिल्यांदाच असा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, ग्लोबल पेटंट फाइलिंगमध्ये भारताने पहिल्या सहा देशांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ही एक महत्त्वाची उपलब्धी आहे. कारण भारत जागतिक स्तरावर टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात पुढे जात असल्याचे यातून दिसून येते. तसेच, आत्तापर्यंत 4G आणि 5G सर्व्हिस देशात हाय इंटरनेट स्पीडसाठी उपलब्ध आहेत. अनेक कंपन्या लोकांना 4G इंटरनेट सर्व्हिस देत आहेत. परंतु, 6G सर्व्हिस अद्याप मिळत नाही.
वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन सँडर्डाइजेशन असेंब्ली या कार्यक्रमाचे आयोजन इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनद्वारे (ITU) केले जाते. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन ही युनायटेड नेशन्सची एक एजन्सी आहे, जी इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या विकासाला आणि वापराला प्रोत्साहन देते. वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन सँडर्डाइजेशन असेंब्लीमध्ये सहभागी होण्यासाठी येणारे प्रतिनिधी 6G साठी आवश्यक असलेल्या मानकांवर चर्चा करतील.
दरम्यान, 6G हे पुढील पिढीचे मोबाइल नेटवर्क टेक्नॉलॉजी आहे. ते 5G पेक्षा कितीतरी पटीने वेगवान आणि अधिक विश्वासार्ह असेल. 6G चा वापर जलद आणि सहज कार्य पूर्ण करण्यासाठी केला जाऊ शकतो. भारतात वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन सँडर्डाइजेशन असेंब्लीचे आयोजन करणे ही एक महत्त्वाची संधी आहे. यामुळं भारताला जागतिक स्तरावर तांत्रिक नेतृत्व दाखवण्याची संधी मिळेल. हे भारताला इतर देशांशी सहकार्य करण्याची आणि जागतिक तांत्रिक मानके विकसित करण्याची संधी देखील प्रदान करेल.