नवी दिल्ली : निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता (जेनरेटिव्ह एआय) क्षेत्रात भारताची जबरदस्त घोडदौड सुरू असून, २०२८ पर्यंत भारत अमेरिकेलाही मागे टाकू शकतो, असे ‘गिटहब’ने जारी केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. जेनरेटिव्ह एआयच्या वापरात भारतीय विकासकांच्या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, ‘नवता आणि तंत्रज्ञान याबाबतीत भारतीय तरुण जगात सर्वश्रेष्ठ आहेत.’
‘गिटहब’च्या अहवालानुसार, जेनरेटिव्ह एआयच्या बाबतीय भारत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय विकासक यात संपूर्ण शक्ती पणाला लावून काम करीत आहेत. जेनरेटिव्ह एआयच्या बाबतीत भारत जगात सर्वाधिक तेजीने वाढणाऱ्या १० विकासक समुदायांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. या यादीत अमेरिका पहिल्या, भारत दुसऱ्या, हाँगकाँग तिसऱ्या, चीन चौथ्या आणि जर्मनी पाचव्या स्थानावर आहे, अशी माहिती गिटहबचे सीईओ थॉमस डोहमके यांनी दिली.
१.७ कोटींपेक्षा अधिक या प्लॅटफॉर्मवरील भारतीय विकासकांची संख्या झाली आहे. ०२ कोटी विकसक यंदा फेब्रुवारीपर्यंत अमेरिकेत गिटहबचा वापर करीत होते. १.३२ कोटी एवढा भारतीय विकासकांचा आकडा होता.