मुंबई - सध्या प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन आला आहे. स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. एकवेळ आपलं पाकिट घरी विसरल्यावर जितकं टेंशन येणार नाही त्याहून जास्त टेंशन मोबाइल किंवा स्मार्टफोन विसरलो तर येतं. मोबाइल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक ठरला आहे. एकेकाळी गरज म्हणून वापरण्यात येणारा मोबाइल आता व्यसन झालं आहे. कितीही प्रयत्न केला तरी हे व्यसन काही सुटत नाही. एका सर्व्हेनुसार, तंत्रज्ञानाचा फास इतका आवळला आहे की लोक नात्यांपेक्षा मोबाइलला जास्त महत्व देऊ लागले आहेत. लोक आजकाल आपल्या मित्र आणि नातेवाईकांपेक्षा स्मार्टफोनवर जास्त प्रेम करतात असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
जवळपास 33 टक्के लोक ज्यांच्यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे त्यांचा जन्म डिजीटल युगात झाला आहे. हे लोक आपल्या स्मार्टफोनला जवळपास असणा-या लोकांपेक्षा जास्त महत्व देतात. भारतात हे प्रमाण सर्वात जास्त असून पहिल्या क्रमांकावर आहे.
मोटोरोलाने नुकताच एक सर्व्हे केला असून यामध्ये हा खुलासा केला आहे. मोटोरोलाने हॉवर्ड विद्यापीठासोबत मिळून हा सर्व्हे केला आहे. सर्व्हेत सहभागी झालेल्यांपैकी 50 टक्के लोकांनी स्मार्टफोन आपला बेस्ट फ्रेंण्ड असल्याचं सांगितलं आहे. स्मार्टफोन आणि आपल्या दैनंदिन आयुष्याचा समतोल राखण्याची इच्छा असणा-यांमध्येही भारत टॉपवर आहे. जवळपास 64 टक्के भारतीयांनी आपल्या दैनंदिन आयुष्य आणि स्मार्टफोन वापरात समतोल राखला जावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.
स्मार्टफोनच्या अतीवापरामुळे आपल्या नात्यांमध्ये दुरावा आल्याचंही अनेकांनी कबूल केलं आहे. जवळपास 50 टक्के लोकांनी सकाळी उठल्या उठल्या आपण मोबाइल फोन चेक करतो असं मान्य केलं आहे. याबाबतीतही भारत इतर देशांच्या तुलनेत पुढे आहे. 35 टक्के लोकांनी आपण स्मार्टफोनमध्ये जास्तीत जास्त वेळ खर्च करतो अशी कबुली दिली आहे. यामधील जवळपास 44 टक्के लोक असे आहेत ज्यांचा जन्म 1990 ते 2000 दरम्यान झाला आहे. स्मार्टफोनसाठी कमीत कमी वेळ देणे आपल्या हिताचं असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.