नवी दिल्ली- भारतात लोकांचं इंटरनेट प्रेम आता कोणापासूनही लपून राहिलेलं नाही. मुलं, तरूण, वयोवृद्ध सगळेच जण आजकाल स्मार्टफोनचा वापर करताना दिसत आहेत. याच कारणामुळे आज भारत मोबाइल डेटा वापरण्यात दुनियेत टॉप क्रमांकावर गेलं आहे. नीति आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अमेरिका आणि चीनसारखे देश याबाबतील भारताच्या जवळपासही नाहीत.
नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी शुक्रवारी ट्विट करून ही माहिती दिली. 'अद्भुत! 150 करोड जीबी डेटाचा दरमहिन्याला वापर करण्याच्याबरोबर भारत डेटा वापरण्याच्याबाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. भारताचा मोबाइल डेटाचा वापर चीन आणि अमेरिकेच्या संयुक्तपणे वापरपेक्षाही जास्त आहे, असं ट्विट अमिताभ कांत यांनी केलं.
दरम्यान, ही माहिती व आकडेवारीचा कुठलाही स्त्रोत अमिताभ कांत यांनी सांगितला नाही. त्यांचं हे ट्विट अनेकांना लाइक केलं असून अनेक रिट्विटही मिळाले आहेत.देशात रिलायन्स जिओ आल्यानंतर टेलिकॉम क्रांती झाल्याचं बोललं जातं. जिओनंतर विविधा टेलिकॉम कंपन्यांमध्ये डेटाप्लॅन्स बाजारात आणण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. याचाच सरळ परिणाम वापरकर्त्यांवर झाला.