पेटीएम या अॅपवर आता बातम्यांसह माहिती आणि मनोरंजनाचा खजिना खुला करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून यासोबत मॅसेंजरदेखील सुरू करण्याचे संकेत मिळाले आहेत.
पेटीएम अॅपचा वापर डिजीटल व्यवहारांसाठी होतो. यावरून ई-कॉमर्स पोर्टलप्रमाणे विविध उत्पादनांची खरेदी-विक्रीदेखील शक्य आहे. आता मात्र या कंपनीने डिजीटल कंटेंटमध्ये पदार्पण केले आहे. यामुळे लवकरच या अॅपवर बातम्या तसेच अन्य मनोरंजनपर कार्यक्रम उपलब्ध करण्यात येणार आहेत. याबाबत पेटीएम कंपनीतर्फे घोषणा करण्यात आली नसली तरी येत्या काही दिवसात हे सर्व फिचर्स अधिकृतपणे सादर करण्यात येणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. यानुसार सोनी लिव्ह या अॅपचे पेटीएम सोबत इंटीग्रेशन करण्यात येत असून याच्या मदतीने दूरचित्रवाणी कार्यक्रम पाहता येतील. शॉर्ट व्हिडीओज आणि ज्योतिष्यविषयक कार्यक्रमांसाठी ‘फंक यू’ या अॅपचे सहकार्य घेण्यात आले आहे. तर ‘यूप टिव्ही’वरून लाईव्ह न्यूज, ‘न्यूजएपीआय’च्या मदतीने आंतरराष्ट्रीय बातम्या वाचता येतील. याशिवाय क्रिकेटसह अन्य क्रीडा प्रकारांचे लाईव्ह अपडेटही युजर्सला देण्यात येणार आहेत. तर पॉवर प्ले क्रिकेट हा मोफत गेमही युजर्सला खेळता येणार आहे.
पेटीएम कंपनीने अलीकडेच अलीबाबाची मालकी असणार्या आणि हाँगकाँगच्या भांडवल बाजारात लिस्टींग असणार्या ‘एजी टेक’ या कंपनीशी सहकार्याचा करार केला आहे. यानंतर पेटीएम अॅपवर माहिती आणि मनोरंजन उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली करण्यात येत असल्याची बाब सूचक मानली जात आहे. पेटीएम अॅपच्या अपडेट या विभागात हे सर्व कंटेंट देण्यात येणार आहे. याच्या मदतीने या अॅपच्या दैनंदिन व्हिजीटर्सची संख्या वाढणार असल्याचे मानले जात आहे. अर्थात याचा पेटीएम कंपनीच्या उत्पन्नावरही अनुकुल परिणाम होण्याची शक्यता आहेच. दरम्यान, अजून एका वृत्तानुसार पेटीएम आपल्या युजर्ससाठी मॅसेंजर सुरू करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपुर्वीच हाईक या मॅसेंजरने केंद्र सरकारच्या युपीआय प्रणालीवर आधारित पेमेंट सिस्टीम लाँच केली असून व्हाटसअॅपही लवकरच याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर, पेटीएम मॅसेंजर लाँच करून व्हाटसअॅपला चॅलेंज करू शकते अशी माहितीदेखील समोर आली आहे.