नवी दिल्ली - सोशल मीडियात फोटोंच्या दुनियेतून वर्चस्व गाजवणाऱ्या इन्स्टाग्रामचा (Instagram) मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. मात्र आता इन्स्टाग्राम आपली पॉलिसी अधिक कठोर करणार आहे. आपल्या प्लॅटफॉर्मवरून द्वेष पसरवणारी भाषणं, अपशब्द आणि फसवणुकीला आळा घालण्यासाठी इन्स्टाग्राम नवीन पॉलिसीवर काम करत आहे. युजर्सला द्वेष पसरवणारी भाषणं, अपशब्द डायरेक्ट मेसेजमध्ये (DM) येत असल्यास, ती पाठवणाऱ्या व्यक्तीवर आता थेट कारवाई होणार आहे.
इन्स्टाग्राम अशाप्रकारच्या अकाउंट्सला डिसेबल करणार, जे मेसेजद्वारे अपशब्द आणि द्वेष करणारे मेसेज पाठवतात. याबाबत इन्स्टाग्रामने दिलेल्या माहितीनुसार, अपशब्द, चुकीचा भाषा, द्वेषयुक्त भाषण अशा गोष्टींचा वापर केल्यास त्याचा फटका अकाऊंटला बसणार आहे. कोणत्याही युजरने या पॉलिसीचे नियम मोडले, तर त्या युजरचं इन्स्टाग्राम अकाऊंट बंद केलं जाईल असं देखील इन्स्टाग्रामने म्हटलं आहे. एखादा युजर अपमानास्पद मेसेज पाठवल्याबद्दल दोषी आढळल्यास, काही काळासाठी त्यावर बंदी घातली जाईल. त्यानंतरही त्याने सतत तसेच मेसेज पाठवल्यास, त्याचं अकाऊंट कायमचं बंद केलं जाईल.
इन्स्टाग्राम अशाही अकाऊंट्सवर बंदी आणणार आहे, जी खास अपशब्द बोलण्यासाठी तयार करण्यात आली आहेत. इन्स्टाग्राम Hate Speech Controls मॅकेनिजमला अधिक मजबूत करत आहे. बिजनेस तसंच पर्सनल अकाऊटसाठीही हे फीचर वापरण्यात येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवरून Following Tab हटवण्यात आलं आहे. त्यामुळे युजर्सना आपल्या मित्र-मैत्रिणींच्या अॅक्टिव्हीटीवर लक्ष ठेवता येणार नाही.
अरे व्वा! WhatsApp मध्ये 'हे' कमाल फीचर येणार, Facebook प्रमाणे Log Out होणार
व्हॉट्सअॅप युजर्सना आकर्षित करण्यासाठी आता नवनवीन भन्नाट फीचर्स आणत आहे. असंच एक हटके फीचर पुन्हा एकदा आणलं असून याचा मोठा फायदा हा आता युजर्सना होणार आहे. फेसबुकप्रमाणे आता व्हॉट्सअॅपवरही लॉग आऊट करता येणार आहे. व्हॉट्सअॅपमध्ये आपण नेहमीसाठी लॉगिन राहतो. फोनमध्ये इंटरनेट ऑन असेल तर तुम्हाला मेसेज किंवा कॉल येऊ शकतात. त्यावर काहीही बंधन नाही. मात्र आता व्हॉट्सअॅपपासून लोकांना ब्रेक देण्यासाठी हे नवीन फीचर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युजर्संला व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच एक नवीन लॉग आऊट फीचर मिळणार आहे. या फीचर्सची अनेक दिवसांपासून मागणी केली जात होती. व्हॉट्सअॅपच्या सर्व युजर्संना फोनमध्ये इंटरनेट सुविधा असल्यास 24 तास अॅक्टिव्ह राहतात. लागोपाठ मेसेज आल्यानंतर फोनवर लक्ष जाते. इंटरनेट बंद असल्यानंतर मेसेज येत नाही. आता व्हॉट्सअॅपवरून डिलीट अकाउंटचा पर्याय हटवला जाणार आहे. व्हॉट्सअॅप बीटा व्हर्जनमध्ये नवीन लॉग आऊट फीचरला समावेश करण्यात आला आहे.