नवी दिल्ली - सोशल मीडियात फोटोंच्या दुनियेतून वर्चस्व गाजवणाऱ्या इन्स्टाग्रामचा (Instagram) मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. मात्र आता इन्स्टाग्राम युजर्सना एका वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागत आहे. अनेक युजर्सनी त्यांनी केलेल्या पोस्ट अचानक डिलीट (Post delete) होत असल्याची तक्रार केली आहे. अनेक युजर्सच्या तक्रारींनंतर इन्स्टाग्रामने हा एक बग असल्याची माहिती दिली असून तो फिक्स केला असल्याचंही सांगितलं आहे. या बगमुळे पोस्ट, स्टोरीज तसंच हायलाईट्स देखील गायब होत होत्या.
कंपनीचे प्रमुख एडम मोसेरी (Adam Mosseri) यांनी दिलेल्या माहितीनुसार, युजर्सला ही समस्या एका बगमुळे आली असून ती आता फिक्स केली असल्याचं म्हटलं आहे. इन्स्टाग्राममध्ये ही समस्या त्यावेळी आली, ज्यावेळी काही कार्यकर्ते हरवलेल्या महिलांबाबत जागरुकता अभियान चालवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु इन्स्टाग्रामने दिलेल्या माहितीनुसार, ही समस्या एखाद्या विषयाशी किंवा ठिकाणाशी संबंधित नव्हती, परंतु याचा परिणाम जगभरातील युजर्सवर पाहायला मिळाला, ज्यांना ही समस्या आली. कंपनीने यात भारताचा उल्लेख केला नसला, तरी देशातील अनेक युजर्सनी इन्स्टाग्रामवर कोविड-19 शी संबंधित अपडेटबाबत या समस्येचा उल्लेख केला आहे.
ट्विटरवर एका पोस्टमध्ये इन्स्टाग्रामने सांगितले आहे की, या बगमुळे पोस्ट आणि स्टोरीज आपोआप गायब झाले होते. गायब झालेलं फीड पुन्हा शेअर करण्यात आलं आहे. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये या बगमुळे सर्वाधिक युजर्स प्रभावित झाल्याची माहिती मिळत आहे. इन्स्टाग्रामवर भारतीय युजर्सला गेल्या काही दिवसांत स्टोरी, पोस्ट आणि हायलाईट्सनमध्ये समस्या आल्या. जवळपास तेव्हापासूनच इन्स्टाग्रामने बगची सूचना दिली. कोविड-19 संबंधीत स्टोरीज आणि इतर पोस्ट हटवण्यात आल्याचं भारतीय युजर्सचं म्हणणं आहे.
बगची समस्या अशावेळी आली, जेव्हा ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर कोरोनाची विस्फोटक परिस्थिती हाताळण्याबाबत सरकारवर टीका केली जात होती, त्यावेळी टीकेमुळेच युजर्सच्या अकाउंट्सवर बंदी घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी आता ट्विटरने (Twitter) देखील भारताला मदतीचा हात दिला आहे. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने कोरोनाशी लढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ट्विटरने 15 मिलियन डॉलर्स म्हणजेच 110 कोटींची मदत जाहीर केली आहे. ट्विटरचे सीईओ जॅक पॅट्रिक डोर्सी यांनी सोमवारी ट्विट करून याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी Twitter चा पुढाकार; तब्बल 110 कोटींची केली मदत
"ही रक्कम केअर (CARE), एड इंडिया (Aid India) आणि सेवा इंटरनेशनल यूएसए (Sewa Internationa USA) या तीन संस्थांना दान करण्यात आली आहे. यामध्ये केअरला 1 कोटी डॉलर्स तर एड इंडिया आणि सेवा इंटरनॅशनल यूएसएला अडीच मिलियन डॉलर्स देण्यात आले आहेत" असं म्हटलं आहे. ट्विटरने आपल्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, सेवा आंतरराष्ट्रीय ही हिंदू विश्वास-आधारित, मानवतावादी, ना-नफा सेवा संस्था आहे. हे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, व्हेंटिलेटर, बीआयपीएपी (बिलीवेल पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर) आणि सीपीएपी (सतत पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर) मशीन सारख्या जीवनरक्षक उपकरणांच्या खरेदीसाठी मदत करणार आहे.
टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....