इंस्टाग्रामने आपल्या युजर्सकडून त्यांच्या जन्मतारखेची माहिती मागण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेला कंपनीने 2019 मध्ये सुरुवात केली होती, परंतु तेव्हा ही माहिती देणे बंधनकारक नव्हते. या नवीन नियमाची माहिती फेसबुकच्या युथ प्रोडक्टच्या व्हाईस प्रेजिडेन्ट पवनी दिवाणजी यांनी एका ब्लॉग पोस्ट मधून दिली आहे.
ज्या युजर्सनी याआधी आपली जन्मतारखेची माहिती दिली नाही त्यांना नोटिफिकेशन पाठवण्यात येईल. एका मर्यादित कालावधीत जर ही माहिती दिली गेली नाही तर युजरला इंस्टाग्रामचा वापर करता येणार नाही. यासाठीची तारीख मात्र अजून ठरली नाही. युजर्सनी दिलेल्या माहितीचा वापर करून इंस्टाग्राम एज-सेन्सेटिव्ह पोस्ट्सवर सावधानतेचा इशारा देण्यास सुरुवात करेल.
तरुण युजर्सच्या सुरक्षेसाठी जन्मतारखेची माहिती देणे महत्वाचे आहे, असे दिवाणजी यांनी म्हटले आहे. या माहितीचा वापर योग्य जाहिराती दाखवण्यासाठी देखील करण्यात येईल.
जे लोक चुकीची माहिती देतील त्यांच्यासाठी देखील कंपनीने तरतूद करून ठेवली आहे. इंस्टग्राम ‘हॅपी बर्थडे’ सारख्या पोस्ट्सचा वापर करून तुमच्या वयाचा अंदाज लावू शकते. भविष्यात जर कोणी चुकीचे वय सांगितले आणि कंपनीच्या सिस्टमचा अंदाज वेगळा असेल तर युजरला वय सिद्ध करण्याचा पर्याय मेन्यूमध्ये देण्यात येईल.