इंटेक्स कंपनीने उत्तम दर्जाची सेल्फी काढण्यास सक्षम असणारा अॅक्वा सेल्फी हा स्मार्टफोन ग्राहकांना सादर करत असल्याची घोषणा केली आहे.
इंटेक्स अॅक्वा सेल्फी या मॉडेलमध्ये ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. खरं तर यापेक्षा अनेक मॉडेलमध्ये उत्तम दर्जाचे कॅमेरे असतात. मात्र या मॉडेलमधील फ्रंट कॅमेर्यात एलईडी फ्लॅश प्रदान करण्यात आला असून याच्या मदतीने उत्तम दर्जाच्या सेल्फी प्रतिमा काढता येतील असा दावा कंपनीने केला आहे. तर या स्मार्टफोनचा मुख्य कॅमेरा आठ मेगापिक्सल्सचा असून यातही एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. उर्वरीत फिचर्सचा विचार करता, या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि एचडी अर्थात १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असेल. १.३ गेगाहर्टस क्वॉड-कोअर प्रोसेसरने सज्ज असलेल्या या मॉडेलची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. यात ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची लिथियम आयन बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. तर या स्मार्टफोनमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स देण्यात आले आहेत.
इंटेक्स अॅक्वा सेल्फीमध्ये काही विशेष फिचर्सही आहेत. यात इनबिल्ट क्युआर कोड स्कॅनरचा समावेश आहे. यामुळे कोणतेही थर्ड पार्टी अॅप न वापरता क्युआर कोड स्कॅन करणे सहजशक्य आहे. तसेच यात लोकप्रिय म्युझिक स्ट्रीमिंग म्हणून ख्यात असणारे गाना हे अॅपही प्रिलोडेड अवस्थेत असेल. इंटेक्स अॅक्वा सेल्फी हे मॉडेल ६,६४९ रूपये मुल्यात लाँच करण्यात आले असून ते ग्राहकांना रोझ गोल्ड आणि ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.