नवी दिल्ली - कोरोना काळात वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यामुळे फक्त वाय-फायवर अवलंबून राहावे लागते. पण काही वेळा ऑफिसचे महत्त्वाचे काम सुरू असतानाच इंटरनेटचा स्पीड खूप कमी झाल्याचे दिसून येतं. अशात, महत्त्वाची कामं रखडतात. युजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. इंटरनेट सेवा प्रदात्याला मासिक शुल्क भरूनही तुम्हाला इंटरनेटची समस्या येत असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशा काही भन्नाट टिप्स सांगणार आहोत. ज्याद्वारे तुमच्या वाय-फाय राऊटरच्या इंटरनेटचा स्पीड सुपरफास्ट होईल. जाणून घ्या...
घराच्या मध्यभागी वाय-फाय राऊटर ठेवा
तुमचे वाय-फाय राऊटर सेट करण्यासाठी तुमच्या घराचे केंद्र हे सहसा सर्वोत्तम ठिकाण असते. परंतु, हा सल्ला प्रत्येक घरासाठी योग्य ठरेलच असे नाही . तुम्ही सर्वाधिक इंटरनेट कुठे वापरता यावरही ते अवलंबून आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, राउटर तुमच्या घराच्या सर्वात महत्त्वाच्या भागाच्या मध्यभागी ठेवावा. तुम्हाला सर्वात वेगवान गती हवी असेल तेथे राऊटर मध्यभागी ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुमचा राऊटर घराच्या कोणत्याही कोपऱ्यात असेल तर तुम्हाला वाय-फाय स्पीडमध्ये अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
राऊटर उंचावर ठेवा
राऊटरमध्ये त्यांचे सिग्नल खाली पसरवण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे कव्हरेज वाढवण्यासाठी राऊटर शक्य तितक्या उंच माउंट करणे चांगले. ते एका उंच बुकशेल्फवर ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा भिंतीवर लावा.
आजूबाजूला मोठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे नसावी
उत्तम राऊटर स्पीड हवा असल्यास एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवणे आवश्यक आहे. राऊटर कायम इलेक्ट्रॉनिक्स आणि मोठ्या धातूच्या वस्तूंपासून दूर असलेले स्थान निवडण्याचा प्रयत्न करा. तुमच्या राऊटरजवळील भिंती, मोठे अडथळे आणि इलेक्ट्रॉनिक्स सिग्नलमध्ये व्यत्यय आणतात. उदाहरणार्थ, मायक्रोवेव्ह 2.4 GHz बँडमध्ये मजबूत सिग्नल उत्सर्जित करतात, जो तुमच्या राउटरच्या वायरलेस बँडमध्ये एक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.