इंटेक्सचा कंपनीने आपला अॅक्वा लॉयन्स टी १ प्लस हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.
इंटेक्स कंपनीने आधीदेखील अॅक्वा लॉयन्स या मालिकेत काही मॉडेल्स सादर केले आहेत. टी १ प्लस ही यातील नवीन आवृत्ती आहे. या कंपनीने आजवर आपले बहुतांश मॉडेल्स किफायतशीर रेंजमध्ये सादर केले आहेत. अॅक्वा लॉयन्स टी १ प्लसदेखील याच वर्गवारीतील आहे. हा स्मार्टफोन अवघ्या ५,५६५ रूपये मूल्यात ग्राहकांना सादर करण्यात आला आहे. शँपेन गोल्ड, ब्लॅक आणि रॉयल रेड या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये हे मॉडेल ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा आहे. यामध्ये अमेझॉन शॉपग, डाटाबॅक, गाना, इंटेक्स सर्व्हीसेस, न्यूज पॉइंट, क्युआर कॅमेरा, स्विफ्ट की, इंडिया गेम्झ, युसी मिनी अॅप्स प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आले आहे.
इंटेक्सच्या अॅक्वा लॉयन्स टी १ प्लस या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.
उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, इंटेक्स अॅक्वा लॉयन्स टी १ प्लस या स्मार्टफोनमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि एचडी (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर २.५ डी वक्राकार ग्लास प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये क्वॉड-कोअर कोर्टेक्स ए७ एमपी प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. याच्या पुढील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात ८ आणि २ मेगापिक्सल्सचा समावेश आहे. यामध्ये रिअल बोके इफेक्ट, बॅकग्राऊंड चेंज, नाईट शॉट, फेस डिटेक्शन, पॅनोरामा आणि बर्स्ट मोड आदी फिचर्स देण्यात आले आहेत. तर यातील ८ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा हा एलईडी फ्लॅश आणि ऑटो-फोकस या फिचर्सने सज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये २,४०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे ६ तासांचा बॅकअप देत असल्याचा इंटेक्स कंपनीचा दावा आहे.