इंटेक्स कंपनीने सातत्याने किफायतशीर मूल्यातील स्मार्टफोनच्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने इंटेक्स अॅक्वा लायन्स इ ३ हे मॉडेलदेखील याच म्हणजे एंट्री लेव्हल प्रकारातील असल्याचे दिसून येत आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना ५४९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आला आहे. हे मॉडेल रिलायन्स जिओच्या कॅशबॅक ऑफरसह सादर करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना एकंदरीत २२०० रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.
इंटेक्स अॅक्वा लायन्स इ ३ या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजे १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. ऑटो-फोकस आणि एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. यात २,५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर ५-६ तासांचा बॅकअप तर सुमारे ७-८ दिवसांचा स्टँडबाय टाईम देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. याशिवाय यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.