इनव्हेन्स मोबाइल या चिनी कंपनीने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला असून डायमंड डी२, फायटर एफ१ आणि फायटर एफ२ हे किफायतशीर दरांचे स्मार्टफोन लाँच केले आहेत. भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत चीनी कंपन्यांनी आपली पकड मजबूत केली आहे. लेनोव्हो, वन प्लस, शाओमी, जिओनी, ओप्पो आदींसारख्या कंपन्यांचे प्रॉडक्ट भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. हे यश पाहून आता अन्य चिनी कंपन्यादेखील भारतीय बाजारपेठेत प्रवेश करतांना दिसत आहेत. यात आता इनव्हेन्स मोबाइल या चिनी कंपनीची भर पडली आहे. या कंपनीने डायमंड डी२, फायटर एफ१ आणि फायटर एफ२ हे तीन स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांसाठी सादर केले आहेत. अन्य चिनी कंपन्यांप्रमाणे इनव्हेन्सनेही किफायतशीर दरात उत्तमोत्तम फीचर्स देण्याचा प्रयत्न केला आहे.इनव्हेन्सच्या फायटर एफ१ या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि एचडी (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले दिलेला आहे. यात मीडियाटेकचा एमटी६७३७ प्रोसेसर असेल. याची रॅम २ जीबी व स्टोअरेज १६ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा असेल. यात ३,२०० मिलीअँपिअरची बॅटरी असून फिंगरप्रिंट स्कॅनर दिलेले आहे. तर यातील मुख्य व फ्रंट कॅमेरे अनुक्रमे १३ व ५ मेगापिक्सल्सचे असतील. तर फायटर एफ२ या मॉडेलमध्ये हेच सर्व फीचर्स असून फक्त ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोअरेज दिलेले आहे. या दोन्ही मॉडेल्सचे मूल्य अनुक्रमे ८,९९० आणि ११,४९० रूपये आहे.इनव्हेन्सच्या डायमंड डी२ या मॉडेलमध्ये वरील दोन्ही मॉडेल्सच्या तुलनेत थोडे कमी दर्जाचे फीचर्स आहेत. यातही ५ इंच आकारमानाचा आणि एचडी (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले दिलेला आहे. यात क्वॉड-कोअर प्रोसेसर असेल. याची रॅम २ जीबी व स्टोअरेज १६ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा असेल. यात २,८०० मिलीअँपिअरची बॅटरी असून फिंगरप्रिंट स्कॅनर दिलेले आहे. तर यातील मुख्य व फ्रंट कॅमेरे अनुक्रमे ८ व ५ मेगापिक्सल्सचे असतील. याचे मूल्य ७,४९० रूपये इतके आहे. इनव्हेन्स कंपनीचे हे तिन्ही स्मार्टफोन्स अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणारे आहेत. पहिल्या टप्यात हे तिन्ही मॉडेल्स ऑफलाईन पद्धतीत सादर करण्यात येत असून नंतर मात्र ऑनलाईन माध्यमातूनही उपलब्ध करण्यात येणार आहेत. या तिन्ही स्मार्टफोनसाठी कंपनीने २ वर्षांची वॉरंटी प्रदान केली असून यात खराब झालेल्या पार्टस्चे रिप्लेसमेंट करून मिळणार आहे.
इनव्हेन्स मोबाइल कंपनीची भारतात एंट्री
By शेखर पाटील | Published: January 23, 2018 2:25 PM