तंत्रज्ञान किंवा नवं संशोधनाचे फायदे आणि तोटे असतात. त्याचप्रमाणे, मोबाईल ही 21 व्या शतकातील सर्वात मोठी क्रांती म्हणता येईल. त्यात, इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे जग अगदी जवळ आलंय. या नव तंत्रज्ञानाचा कोट्यवधी लोकांना फायदा होत आहे. मात्र, आयफोनच्या वापरामुळे एका व्यक्तीच्या जीव वाचल्याची घटना समोर आली आहे. आयफोनच्या नवनवीन फिचरची नेहमीच चर्चा होत असते, आता या फिचरचा अनुभवही या घटनेतून सर्वांसमोर आला आहे.
आयफोन म्हणजे महागडा किंवा श्रीमंत लोकांचं काम आहे, अशी सर्वसामान्यांची धारणा आहे. तरीही, आयफोन घेण्यासाठी ग्राहक गर्दी करतानाचेही दिसून आले आहे. आता, तोच आयफोन एका व्यक्तीचा जीव वाचवण्यास कारणीभूत ठरला आहे. एका व्यक्तीच्या कारलाअपघात झाला, तब्बल 400 फूट दरीत ही कार कोसळली होती. त्यावेळी, आयफोन 14 मधील लाईफ सेव्हिंग फिचर म्हणजेच Crash Detection आणि Satelite Emergency SOS मुळे अपघात झालेल्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करण्यात मदत झाली. विशेष म्हणजे या घटनास्थळी मोबाईल नेटवर्क, इंटरनेट किंवा संपर्क साधण्यास इतर कुठलीही सुविधा नव्हती. मात्र, आयफोन 14 मधील फिचरमुळे ते शक्य झालं. ही घटना लॉस अँजेलिस येथील आहे. दरम्यान, यापूर्वीही Apple Smartwatch मुळे एका व्यक्तीचा जीव वाचला होता, ज्यास ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यात आले.
आयफोन 14 मधील Crash Detection फिचर अपघातानंतर लगेच ऑटोमॅटिकरित्या ऍक्टिव्ह होते. त्यामुळे, नेटवर्क नसतानाही सॅटेलाईटशी कनेक्ट होऊन लोकेशन ट्रेस केले जाते. ज्यामुळे, नेटवर्क, इंटरनेट नसेल तरीही संबंधित ठिकाण शोधून वेळेत मदत पोहोचवता येऊ शकते.