आयफोन ६च्या ३२ जीबी स्टोअरेजयुक्त मॉडेलचे सोनेरी रंगातील व्हेरियंट आता अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आले आहे.
२०१४ साली अॅपलने आयफोन ६ हे मॉडेल लाँच केले होते. प्रारंभी हे मॉडेल १६, ६४ आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोअरेजच्या पर्यायांमध्ये भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आले होते. यानंतर या वर्षाच्या प्रारंभी आयफोन ६ हे मॉडेल ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेजच्या पर्यायात भारतीय ग्राहकांना सादर केले होते. हा स्मार्टफोन स्पेस ग्रे या रंगाच्या पर्यायात उपलब्ध करण्यात आला होता. आता हे मॉडेल सोनेरी रंगाच्या पर्यायात भारतीय बाजारपेठेत अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आले आहे. २६,९९९ रूपये मूल्यात ग्राहक याला खरेदी करू शकतो. यासोबत अॅपल कंपनीने काही एक्सचेंज ऑफर्सदेखील प्रदान केल्या आहेत. यात निवडक बँकांच्या कार्डांसाठी सहा महिन्यांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने ईएमआयचा पर्यायदेखील देण्यात आला आहे. तर व्होडाफोनने आयफोन ६ हे मॉडेल खरेदी करणार्या आपल्या युजरला ४५ जीबी अतिरिक्त डेटा देण्याची घोषणा केली आहे.
आयफोन ६ या स्मार्टफोनमध्ये ४.७ इंच आकारमानाचा आणि १३३४ बाय ७५० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले असून ६४ बीट ए८ प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम एक जीबी असून वर नमूद केल्यानुसार ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असेल. प्रारंभी हे मॉडेल आयओएस १० या आवृत्तीवर चालणारे असले तरी गेल्या वर्षीच याला आयओएस ११ हे अपडेट मिळाले आहे. यातील मुख्य कॅमेरा ८ तर फ्रंट कॅमेरा १.२ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. आयफोन या मालिकेतील बहुतांश स्मार्टफोन हे फ्लॅगशीप या प्रकारातील असल्यामुळे त्यांचे मूल्यदेखील खूप आहे. या पार्श्वभूमिवर अॅपलने भारतासारख्या विकसनशील बाजारपेठेत मध्यम मूल्यातला आयफोन ६ हा स्मार्टफोन ३२ जीबी स्टोअरेजमध्ये लाँच केल्याचे मानले जात आहे.
ठळक मुद्दे* बाजारात आधीच आयफोन ३२ जीबी व्हेरियंट स्पेस ग्रे या रंगात उपलब्ध आहे.* आयफोन ६ चे सोनेरी मॉडेल आता मिळणार.* हे मॉडेल फक्त अमेझॉन इंडिया पोर्टलवर उपलब्ध असेल.