नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या संकटामुळे अनेक कंपन्या चीनमधून बाहेर पडत आहेत. भारतासाठी ही एक मोठी संधी आहे असून त्याची अंदाज केवळ ॲपलच्या आयफाेनच्या निर्यातीवरून येईल. वित्त वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या नऊ महिन्यांत भारतातून २.५ अब्ज डॉलरच्या आयफोनची निर्यात करण्यात आली. २०२१-२२ च्या समान कालावधीच्या तुलनेत हा आकडा दुपटीपेक्षा अधिक आहे.
सूत्रांनी सांगितले की, ॲपलसाठी उत्पादन करणाऱ्या प्रमुख दाेन कंपन्या फॉक्सकॉन आणि विस्ट्रॉन यांनी चालू वित्त वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत प्रत्येकी एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक ॲपल उपकरणांची निर्यात केली. ॲपलसाठी उत्पादन करणारी पेगाट्रॉन कॉर्पनेही जानेवारीपर्यंत सुमारे ५० कोटी डॉलरची निर्यात केली आहे.
चीनवर अवलंबून राहायचे नाही
ॲपलला आपल्या उपकरणांच्या उत्पादनांसाठी चीनवरचे अवलंबन घटवायचे आहे. चीनमधील विविध घडामाेडींमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे उत्पादन अंदाजात घट करावी लागली.
आयफोन निर्मिती प्रकल्पाचे टाटा करणार अधिग्रहण
आयफोनचे उत्पादन करणारी तैवानची विस्ट्रॉन कॉर्प कंपनी अधिग्रहित करण्यासाठी टाटा उद्योग समूह वाटाघाटी करीत असून मार्चअखेरपर्यंत हे अधिग्रहण पूर्ण होण्याची शक्यता आहे. आधी दोन्ही कंपन्या संयुक्त भागीदारीसाठी बोलणी करीत होत्या. nटाटा समूह यात प्रकल्पाचे मुख्य उत्पादन पाहील. विस्ट्रॉन सहायकाच्या भूमिकेत असेल. टाटांसारख्या स्थानिक समूहांनी ॲपलच्या उत्पादनासाठी दावेदारी दाखल केल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रातील चीनच्या मक्तेदारीला आव्हान मिळणार आहे.
भारत फायदेशीर का?
- ५०% कमी खर्च चीनच्या तुलनेत
- ४-६% पीएलआय सबसिडी लाभ
- मुबलक कामगार उपलब्ध