आयटेल मोबाईल या कंपनीने भारतीय ग्राहकांना जंबो बॅटरीने सज्ज असणारा पॉवर प्रो पी ४१ हा स्मार्टफोन अवघ्या ५,९९९ रूपये मूल्यात सादर केला असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणारे आहे.
भारतीय स्मार्टफोनच्या बाजारपेठेत ग्राहकांना आकृष्ट करून घेण्यासाठी विविध कंपन्या नवनवीन मार्गांचा अवलंब करत आहेत. या अनुषंगाने अलीकडच्या काळात बॅटरी हा घटक अतिशय महत्वाचा बनला आहे. सध्या मल्टी-टास्कींगचे युग असल्याने युजर मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनचा वापर करतो. यातच जिओसह अन्य कंपन्यांनी किफायतशीर दरात फोर-जी प्लॅन्स जाहीर केल्यामुळे व्हिडीओ पाहण्याच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे अर्थातच बॅटरीचा वापर हा महत्वाचा घटक बनला आहे. यामुळे काही कंपन्या दीर्घ काळ टिकणार्या बॅटर्यांनी सज्ज असणारे स्मार्टफोन सादर करत आहेत. यात आता आयटेल पॉवर प्रो पी४१ या मॉडेलची भर पडली आहे. यात तब्बल ५,००० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल ५१ तासांचा बॅकअप मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर यातून संगीताचा तब्बल ९५ तासांपर्यंत आनंद घेता येत असल्याचेही कंपनीने नमूद केले आहे. तर हे मॉडेल अँड्रॉइडच्या ७.० अर्थात नोगट या आवृत्तीवर चालणारे असेल.
उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, आयटेल पॉवर प्रो पी४१ या मॉडेलमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि ८५४ बाय ४८० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस ऑन सेल डिस्प्ले असेल. याची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज आठ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. यातील मुख्य कॅमेरा ड्युअल फ्लॅश आणि ऑटो-फोकस या प्रणालींनी युक्त असून ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात २ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी कनेक्टिव्हिटीचे पर्याय देण्यात आले आहेत. आयटेल पॉवर प्रो पी४१ हे मॉडेल ग्राहकांना ग्रॅफाईट, सिल्व्हर ग्रे आणि शँपेन या तीन आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत.