माणसं आणि मोबाइल लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत आपल्या सर्वांना सध्या गॅझेट्सची – विशेषत: मोबाइल फोनची अतिशय सवय लागलेली आहे. ‘आपण बरं आणि आपला मोबाइल बरा’ कारण आपलं सर्व काम मोबाइलद्वारे होतं. लहान मुलांना अभ्यास करायचा असेल तरीसुद्धा ते या मोबाइलद्वारे अभ्यास करतात. आपण एकमेकांशी गप्पा मारतो ते सुद्धा या मोबाइलद्वाराच. अशा प्रकारे गेल्या काही वर्षांत आपण एकमेकांवर, घरातल्या इतर माणसांवर, मित्र-मैत्रिणींवर, नातेवाइकांवर अवलंबून राहण्यापेक्षा या मोबाइलवर अवलंबून राहायला लागलेलो आहोत. आणि त्यामुळे काहीसे एकलकोंडेसुद्धा झालेले आहोत.
अशा प्रकारे हे यंत्र कितीही जादुई असेल तरीसुद्धा प्रत्यक्ष भेटणारी माणसं याची भरपाई ते करू शकत नाही. मात्र असं दिसतंय की मोबाइलची सवय आपल्यापैकी बहुतेकांना लागून गेलेली आहे. याचे दुष्परिणाम तर असंख्य आहेतच; परंतु सध्या जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. त्यानुसार लहान मुलं एकाच यंत्रावर अवलंबून राहत आहेत, त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत.
या एका गोष्टीमुळे जी कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित व्हायला हवी, ती होत नाहीत. यातली एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे लहान मुलांच्या संदर्भात प्रश्न आहेत, त्यांचं सामाजिकीकरण योग्य पद्धतीने होत नाही. एकाग्रता, स्मरणशक्तीवर परिणाम होतो, भाषिक कौशल्यांच्या बाबतीत मुलं मागे पडतात. पण, अशा पद्धतीचे परिणाम सर्व वयोगटाच्या लोकांवर कमी जास्त प्रमाणात होत आहेत. काही काम केलं नाही तर स्मरणशक्ती टिकून कशी राहणार? कोणाचे फोन नंबर्स पूर्वीसारखे लक्षात नसतात, ही त्यातली ठळक गोष्ट. पण इतरांशी मारलेल्या गप्पा, एकत्र मिळून केलेली कोणत्याही प्रकारची कामं, एकत्र मिळून ठरवलेल्या योजना आणि त्या पार पाडणं, वेगवेगळ्या व्यक्तींकडून काही गोष्टी समजून घेणं, त्यांना काही गोष्टी सांगणं या सगळ्यातून जे काही सामाजिक अभिसरण होतं ते मेंदूमध्ये सकारात्मक परिणाम घडवून आणतं. म्हणूनच ही धोक्याची सूचना आहे. मेंदू जागता - चालता फिरता ठेवायला हवा. त्यासाठी एकलकोंडेपणा योग्य नाही आणि माणसांना पर्याय नाही.