भारतात सॅटेलाईट इंटरनेट सर्व्हिसबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची कंपनी स्टारलिंक ही सेवा सुरु करेल असे बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या आकाशात स्टारलिंकचे सॅटेलाईट एका ओळीने दिसले होते. परंतू, या स्टारलिंकच्या आधीच देशाची अंतराळ संस्था ISRO ने बाजी मारली आहे.
सॅटेलाईट इंटरनेट सेवा देण्यासाठी Hughes Communications India ने इस्त्रोसोबत हात मिळविला होता. आता कंपनीने हाई-थ्रोपुट सॅटेलाइट (HTS) ब्रॉडबँड सर्व्हिस कमर्शिअली लाँच केली आहे. याला इस्त्रोचा मोठा बॅकअप आहे. यामुळे देशाला स्वदेशी अशी सॅटेलाईट इंटरनेट सेवा मिळाली आहे. स्टारलिंकने भारतातील आपले काम थांबविले आहे. मोदी सरकारने मस्क यांच्या या कंपनीला आवश्यक लायसन न घेतल्यामुळे बंदी घातली आहे. आता इस्त्रोच्या माध्यमातून हाय स्पीड ब्रॉडबँड सर्व्हिस दिली जाणार आहे. याद्वारे सुरुवातीला उद्योग आणि सरकारी कार्यालयांना जोडले जाणार आहे.
लोकांचे जीवनमान सुधारता येईल यासाठी इस्रोमध्ये आम्ही खाजगी क्षेत्रासोबत काम करण्याचे मार्ग शोधत आहोत, असे इस्रोच्या अंतराळ विभागाचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ म्हणाले. इस्त्रोच्या सॅटेलाईटद्वारे हे इंटरनेट पुरविले जाणार आहे. यामुळे एचसीआय चांगल्या वेगाने सातत्य राखून इंटरनेट सेवा सुरु ठेवेल असे म्हटले जात आहे. यामुळे देशातील कनेक्टिव्हिटीचा अनुभव आणखी सुधारेल. भारताच्या डिजिटल क्रांतीला गती देखील मिळणार आहे.
HCI ची सॅटेलाईट ब्रॉडबँड २ लाखांहून अधिक उद्योग आणि सरकारी कार्यालयांना दिले जाणार आहे. याशिवाय राज्य आणि केंद्र सरकारांच्या प्रकल्पांनाही ही सेवा दिली जाणार आहे. यासाठी कंपनी इस्त्रोचे ७५ हून अधिक सॅटेलाईट वापरत आहे. इस्रोच्या केयू-बँड क्षमतेच्या GSAT-11 आणि GSAT-29 उपग्रहांपासून हाय-स्पीड इंटरनेट सेवा दिली जाणार आहे. यामुळे दुर्गम भागातही इंटरनेटची सेवा मिळू शकणार आहे.